मनसे कार्यकर्त्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:13 AM2021-02-24T04:13:21+5:302021-02-24T04:13:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात कंपनीत शिरून तोडफोड करून सुरक्षारक्षकाला मारहाण करणार्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात कंपनीत शिरून तोडफोड करून सुरक्षारक्षकाला मारहाण करणार्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर येरवडा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्या गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकारात पवन बासोळे (वय २६, रा. वाघोली) हे सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना येरवडा येथील अशोक प्लाझा इमारतीमधील फ्रेसेनियस काबी इंडिया या कंपनीमध्ये सोमवारी दुपारी सव्वाएक वाजता घडली होती.
बासोळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, येरवडा पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
कंपनीच्या कामगारविरोधी धोरणाविरुद्ध मनसेचे काही कार्यकर्ते कंपनीच्या चौथ्या मजल्यावरील कार्यालयात आले. त्यांनी आपल्याबरोबर आणलेल्या हॉकी स्टीक व लाकडी दांडक्यांनी कंपनीच्या मुख्य दरवाज्याच्या काचा फोडल्या. यावेळी सुरक्षारक्षक म्हणून म्हणून काम करणारे बासाेळे यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी दहशत पसरवून बासोळे यांना हॉकी स्टीकने बेदम मारहाण केली.
पोलिसांनी या कार्यकर्त्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मनसे, भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी वेळोवेळी आंदोलने केली. त्यात काही ठिकाणी तोडफोडीच्या व अधिकारी, कर्मचा-यांना मारहाणीच्या घटना घडल्या. मात्र, यंदा प्रथमच मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण केल्याने खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा प्रथमच दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आळेकर करीत आहेत.