पुण्यात मनसे कार्यकर्त्यांचा धुमाकूळ; उत्तर भारतीय चहा, पाणीपुरीवाल्यांची दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 06:15 PM2017-11-02T18:15:46+5:302017-11-02T18:22:35+5:30
फेरीवाल्यांविरोधात मनसेने सुरू केलेल्या आंदोलनाचे लोण मुंबईपाठोपाठ पुण्यातही पोहोचले आहे. बुधवारी कार्यकर्ते नारायण पेठ येथील कार्यालयाजवळ जमा झाले होते. येथून फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुणे : फेरीवाल्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केलेल्या आंदोलनाचे लोण मुंबईपाठोपाठ पुण्यातही पोहोचले आहे. . त्यांचे स्टॉल आणि दुकाने यांची तोडफोड केली.
बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मनसेचे कार्यकर्ते नारायण पेठ येथील कार्यालयाजवळ जमा झाले होते. येथून अचानक फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे गट करून शहरातील विविध भागांत पाठविण्यात आले.
जंगली महाराज रस्त्यावर कपडे, खाद्यान्न, पाणीपुरी विकत असलेल्यांना लक्ष्य करण्यात आले. त्यांचे स्टॉल उधळून लावण्यात आले. काही जणांना धक्काबुक्कीही करण्यात आली. पादत्राणांच्या दुकानांनाही या आंदोलनाचा फटका बसला.
सिंहगड रोड परिसरातही अनेक फळे आणि भाजीपाल्यांचे स्टॉल मनसेच्य कार्यकर्त्यांनी उधळून लावले. यामध्ये विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले. त्यांचे स्टॉल तोडण्यात आले. सावलीसाठी लावण्यात आलेल्या छत्र्याही मोडून टाकण्यात आल्या. पोलिसांना या प्रकाराची कल्पनाच नव्हती. त्यामुळे बराच वेळ हा प्रकार सुरू होता.
मुंबईतील एलिफिन्स्टिन पुलाच्या दुर्घटनेनंतर मनसेच्या वतीने फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. यासाठी पंधरा दिवसांचे अल्टीमेटमही देण्यात आले होते. त्यानंतर मुंबईतही फेरीवाल्यांविरोधात आंदोलने करण्यात आली होती.
पुण्यात मनसेच्या वतीने फेरीवाल्यांविरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आज अगदी गनिमी कावा पध्दतीने आंदोलन करण्यात आले.