मनसेची बोट महापौरांच्या दालनात
By admin | Published: November 21, 2015 04:08 AM2015-11-21T04:08:49+5:302015-11-21T04:08:49+5:30
कात्रजच्या तलावात बोटिंग सुरू करावी, यासाठी महापालिका सभागृहात आणलेली बोट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सभाच तहकूब झाल्यानंतर सभागृहातून थेट महापौरांच्या दालनातच नेली.
पुणे : कात्रजच्या तलावात बोटिंग सुरू करावी, यासाठी महापालिका सभागृहात आणलेली बोट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सभाच तहकूब झाल्यानंतर सभागृहातून थेट महापौरांच्या दालनातच नेली. तिथे झालेल्या चर्चेनंतर महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी या विषयाची माहिती घेऊन नंतर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन मनसेच्या नगरसेवकांना दिले.
कात्रज तलावातील बोटिंग गेल्या काही वर्षांपासून बंद आहे. या बोटिंगच्या संदर्भात ठेका देण्यावरून काही वाद असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पालिकेने हा ठेकाच बंद केला असून त्यामुळे बोटिंगही बंद आहे. ते सुरू करावे, अशी मागणी करीत मनसेच्या सदस्यांनी आज महापालिका सभागृहात एक कृत्रिम बोटच आणली.
मात्र तहकूबीच्या सूचनेचा आधार घेत महापौरांनी सभा तहकूब केली. त्यामुळे आता या बोटीचे करायचे काय, असा प्रश्न मनसेच्या सदस्यांसमोर निर्माण झाला. महापौरांच्या आसनासमोरील टेबलावर ठेवलेली ही बोट पुन्हा खाली घेऊन काय करायचे, यावर त्यांच्यात बराच वेळ खलबत सुरू होते.
(प्रतिनिधी)
रूपाली पाटील-ठोंबरे यांनी यावर मार्ग काढत त्या बोटीतच बसकण मारली व अन्य सदस्यांना ती बोट महापौरांच्या दालनात घेऊन जाण्यास सांगितले. वसंत मोरे व अन्य सदस्यांनी त्याप्रमाणे सभागृहातून ही बोट दोरीने ओढत थेट महापौरांच्या दालनात नेली. दरवाजातून आत नेताना ती थोडी तुटली, मात्र तरीही रूपाली पाटील-ठोंबरे त्यात बसून होत्या. मोरे यांनी धनकवडे यांना बोटिंग बाबतची वस्तुस्थिती सांगितले. एकाही उद्यानात मुलांसाठी बोटिंगची सुविधा नाही. कात्रज तलावात ती सुरू करता येणे शक्य असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे अशी तक्रार त्यांनी केली. प्रशासनाने दिवाळीच्या सुट्टीत बोटिंग सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र पाळले नाही असे ते म्हणाले.