मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलं अन् यशवंतराव चव्हाणही; राज ठाकरेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 04:44 PM2021-08-20T16:44:51+5:302021-08-20T16:50:06+5:30
शरद पवारांच्या या टीकेनंतर आता राज ठाकरेंनी यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
पुणे: महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच जातीवादाचा मुद्दा प्रखरतेने समोर आला असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) एका कार्यक्रमात मांडले होते. त्यानंतर राज्यात गदारोळ माजला. त्यावर अनेक चर्चा घडल्या. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील टीका केली होती. शरद पवारांच्या या टीकेनंतर आता राज ठाकरेंनी यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
राज ठाकरेंना माझा सल्ला आहे की, प्रबोधनकारांचे लिखाण वाचा, प्रबोधनकारांचे लिखाण नक्कीच त्यांना योग्य रस्ता दाखवेल अशी मला खात्री आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. यावर आज मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलं आणि यशवंतराव चव्हाण देखील वाचलं. महाराष्ट्र जातीपातीच्या विचारातून बाहेर येणं गरजेचं आहे, हा वक्तव्यमागचा अर्थ होता, असं राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच पवारांच्या भेटीला जातो, तेव्हा मराठा म्हणून जात नाही, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले. जातीचं वातावरण तयार करण्यात येत आहे, असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहे. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
तत्पूर्वी, महाराष्ट्रामध्ये जाती पहिल्यापासून होत्या. प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल एक अभिमान होता. तसेच जातीवरती मतदानही व्हायचं आणि ते आजही होतं. मला सध्या सध्या महाराष्ट्रामध्ये असं दिसतं की, लोकांना जातीबद्दल अभिमान हा आहेच, पण दूसऱ्याच्या जातीबद्दलचा द्वेष वाढत गेला आहे. हे महाराष्ट्राच्या एकूण सांस्कृतीला डाग लावणार चित्र आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं.
तसेच प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल अभिमान असतो. मात्र दूसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष हा वाटणं, हे कधी महाराष्ट्रात नव्हतं. हे गेल्या २०-२५ वर्षांपासून सुरु झालं. जातीचा मुद्दा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या ओळखीचा भाग झाला आहे. महाराष्ट्रात जातीचा मुद्दा हा सर्वांथाने मोठा झाला असेल, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर. कोण जेम्स लेन, कसलं पुस्तक लिहिलं? तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता. बरं तो आता कोण आहे आणि कुठे आहे? त्या सगळ्या वातावरणात मराठा समाजाच्या मुलांना, मुलींना, हे कोणी लिहिले तर ब्राम्हणांनी लिहिले मग माळी समाज मग इतर समाज हे सगळं रचलेलं आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.
प्रविण गायकवाड यांची राज ठाकरेंवर टीका-
राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला राज ठाकरे हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे. त्यांना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केली आहे.
'परंतु हा संघर्ष उभा करत असताना त्यांना १८९९ ते १९९९ या शंभर वर्षाच्या काळात महाराष्ट्रात झालेल्या सांस्कृतिक संघर्षाचा आणि आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या वारशाचा विसर पडला आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. त्यांची सध्याची जी काही मांडणी आहे, ती प्रबोधनकार ठाकरेंच्या ब्राह्मणेतर विचारांपासून फारकत घेणारी आणि पुरंदरेंच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या विचारणसरणीला जवळ करणारी आहे हे मात्र नक्की ! असेही ते म्हणाले आहेत.