राज ठाकरे यांनी घेतली शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 02:51 PM2019-06-04T14:51:46+5:302019-06-04T14:53:57+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. मात्र ही कौटुंबिक भेट असल्याचे सांगत ठाकरे यांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.
पुणे :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. मात्र ही कौटुंबिक भेट असल्याचे सांगत ठाकरे यांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.
ठाकरे आणि पुरंदरे कौटुंबिक ऋणानुबंध आहेत. अनेक कार्यक्रमांमध्येही हे दिसून आले आहे. पुरंदरे यांना पद्मविभूषण सन्मान जाहीर झाल्यावरही ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले होते. गेले तीन दिवस ठाकरे पुण्यात असून त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिने पक्ष संघटनेची चाचपणी केली. त्यानंतर त्यांनी मुंबईला रवाना होण्यापूर्वी पुरंदरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पुरंदरे यांच्या प्रकृतीची चौकशी केल्याचे समजते. पुरंदरे यांच्या पुण्यातील पार्वती भागातील निवासस्थानी ही भेट झाल्याचे समजते.
या भेटीबाबत पुरंदरे म्हणाले की, अनेक वर्षांपासून माझा आणि ठाकरे कुटुंबाचा ऋणानुबंध आहेत. त्यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती पुण्यात आल्यावर मला भेटायला येत असते. राज ठाकरेही अनेकदा भेट घेत असतात. मात्र ही भेट वैयक्तिक असते. त्यात कोणत्याही राजकीय गप्पा होत नाहीत.