Video: ...अन् राज ठाकरे मिष्किलपणे म्हणाले, 'मी काय कुंद्रा आहे का?'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 02:23 PM2021-07-28T14:23:44+5:302021-07-28T14:24:05+5:30
राज ठाकरे पुण्यातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात दाखल झाल्यानंतर सर्व पत्रकार, कॅमेरामन, फोटोग्राफर्सने त्यांचे फोटोज, व्हिडीओ घेण्यासाठी गर्दी केली होती.
पुणे : फेब्रुवारीत होणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत संपूर्ण ताकदीने उतारण्यासाठी मनसेने तयारी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आजपासून तीन दिवस मनसेप्रमुखराज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. सकाळीच ९.३० च्या सुमारास राज ठाकरे नवी पेठेतील पक्षाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांचा पंधरा दिवसांच्या आत हा दुसरा तीन दिवसांचा दौरा आहे. त्यामुळे मनसे येणाऱ्या निवडणुकीत किती नगरसेवक निवडून आणणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
राज ठाकरे पुण्यातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात दाखल झाल्यानंतर सर्व पत्रकार, कॅमेरामन, फोटोग्राफर्सने त्यांचे फोटोज, व्हिडीओ घेण्यासाठी गर्दी केली होती. बराचवेळ फोटोग्राफर फोटोज क्लिक करत होते, हे पाहून राज ठाकरेंनी मिश्किल टिप्पणी केली. फोटोग्राफर्सकडे पाहून राज ठाकरेंनी हसत म्हटलं, सर्व आलं का कान.. नाक? किती वेळा तेच तेच, असं म्हणत 'मी काय कुंद्रा आहे का?', असं मिष्किल भाष्य राज ठाकरे यांनी केलं.
Video: ...अन् राज ठाकरे मिष्किलपणे म्हणाले, 'मी काय कुंद्रा आहे का?' pic.twitter.com/eSl1qkjLcD
— Lokmat (@MiLOKMAT) July 28, 2021
सध्या पुणे महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांचेही बऱ्यापैकी नगरसेवक आहेत. त्यामुळे मनसे यंदाच्या निवडणुकीत नगरसेवकांची संख्या दोन अंकी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे स्वतः पदाधिकारी निवडण्यासाठी मुलाखती घेणार आहेत.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे नाशिक मुंबईकडे लक्ष देणार आहे. राज ठाकरे यांनी नुकताच पुण्यात तीन दिवस मुक्काम करून सर्व मतदारसंघातील पदाधिकारी, माजी नगरसेवक, प्रभागप्रमुख आदींशी चर्चा केली. त्यानुसार २८ ते ३० जुलै असा तीन दिवसीय दौरा निश्चित करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत कसबा, पर्वती आणि हडपसर या मतदारसंघाच्या मुलाखती होणार आहेत. गुरुवारी शिवाजीनगर, कोथरूड आणि कँटोन्मेंट मतदारसंघाच्या व शुक्रवारी खडकवासला, वडगावशेरी मतदारसंघाच्या मुलाखती होणार आहे.