राज ठाकरेंचा बॅनर लागला; मराठीहृदयसम्राटच्या जागी नवी उपाधी; बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 08:56 AM2022-04-15T08:56:27+5:302022-04-15T08:56:47+5:30
आधी राज ठाकरेंच्या नावापुढे मराठी हृदयसम्राट उपाधी लागायची; आता मराठी हृदयसम्राटची जागा नव्या उपाधीनं घेतली आहे
पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर मराठी भाषेचा, भूमिपुत्रांचा विषय हाती घेणाऱ्या राज ठाकरेंचा प्रवास आता आक्रमक हिंदुत्वाच्या दिशेनं सुरू झाला आहे. मशिदीवरील भोंगे उतरवा, अन्यथा त्यांच्यासमोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा लावू, असा इशारा राज यांनी राज्य सरकारला दिला. मुंबई, ठाण्यात राज यांच्या सभा झाल्या. आता राज ठाकरे पुण्यात जाणार आहेत. उद्या हनुमान जयंतीनिमित्त राज यांच्या हस्ते महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे.
पुण्यातल्या खालकर मारुती चौकात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती होईल. या कार्यक्रमाचं पोस्टर मनसेकडून तयार करण्यात आलं आहे. त्यावर राज यांचा उल्लेख हिंदुजननायक असा करण्यात आला आहे. राज यांच्या नावापुढे लावण्यात आलेली ही उपाधी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
पुढच्या महिन्याच्या सुरुवातील ईद आहे. ३ मे रोजी देशभरात ईद साजरी होईल. राज यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. भोंगे खाली न उतरवल्यास मशिदींसमोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा लावण्यात येईल, असा इशारा राज यांनी दिला आहे.
राज यांनी हाती घेतलेल्या नव्या मिशनची सुरुवात उद्या पुण्यातून होईल. खालकर मारुती चौकात राज यांच्या हस्ते महाआरती होईल. सामुदायिक हनुमान चालिसा पठण करण्यात येईल. या भागात जवळपास कोणतीही मशीद नाहीए. मात्र राज यांच्या हस्ते होणारी महाआरती बदलत्या राजकीय वातावरणाचे स्पष्ट संकेत मानले जात आहेत.
राज यांचं बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल?
शिवसेनेच्या स्थापनेनंतर बाळासाहेब ठाकरेंनी मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी माणूस हे विषय हाती घेतले. दाक्षिणात्य नागरिकांविरोधात हटाव लुंगी आंदोलन सुरू केलं. भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून प्रयत्न केले. त्यामुळे पक्षाला यशही मिळालं. मात्र ते मर्यादित स्वरुपाचं होतं. यानंतर बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. बाळासाहेबांच्या नावापुढे हिंदूहृदयसम्राट उपाधी वापरली जाऊ लागली. आता राज यांचा प्रवास त्याच दिशेनं सुरू झाला आहे. हिंदूहृदयसम्राट या उपाधीशी साधर्म्य असलेली हिंदूजननायक उपाधी त्यांच्या नावासमोर लावण्यात आलेली आहे. मराठी हृदयसम्राट ते हिंदूजननायक हा प्रवास राज यांना नेमका कुठे घेऊन जाणार, ते भविष्यात स्पष्ट होईल.