स्मार्ट सिटीचा अति'स्मार्ट' कारभार : मनसेकडून चौकशीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 03:26 PM2018-11-01T15:26:17+5:302018-11-01T15:27:09+5:30
पुण्यात सुरु असलेल्या स्मार्ट सिटी कंपनीच्या कामगार भरती प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आक्षेप नोंदवण्यात आला आहे.
पुणे : पुण्यात सुरु असलेल्या स्मार्ट सिटी कंपनीच्या कामगार भरती प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आक्षेप नोंदवण्यात आला आहे. कंपनीची कर्मचारी भरती नेमकी कोणत्या नियमाखाली केली जाते यासंबंधीची प्रश्नावली मनसेने आयुक्त सौरभ राव यांना पाठवली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे स्मार्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या कार्यालयात अधिक्षक, वरिष्ठ-कनिष्ठ लिपिक, फोटोग्राफर, सिव्हिल इंजिनिअर अशा जागांची जाहिरात देऊन ऑक्टोबर २०१७मध्ये ११ महिन्यांसाठी रीतसर भरती करण्यात आली.ऑक्टोबर २०१८मध्ये या कर्मचाऱ्यांना तीन दिवसांचा ब्रेक घेऊन पुन्हा महिनाभर कामावर घेण्यात आले. आता ऑक्टोबरच्या शेवटच्या दिवशी त्यांना एका खासगी कंपनीमार्फत अर्ज करण्यास सांगितला आहे. या कंपनीमार्फत अर्ज केल्यावर पूर्वीप्रमाणे कामावर येण्यासही सांगितले आहे.
याच विषयावर मनसेने संबंधित एचआर कंपनी कुठून आली असा सवाल विचारला आहे. या कंपनीसोबत स्मार्ट सिटी कंपनीचा काही करार झाला आहे का असा सवालही विचारण्यात आला आहे. जर करार झाला असेल तर तत्पूर्वी त्याची वर्तमानपत्रात जाहिरात देऊन निविदा का काढण्यात आली नाही असा प्रश्नही पुढे आला आहे. हा सर्व प्रकार गांभीर्याने घेऊन आयुक्तांनी याची चौकशी करावी अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली.