खड्यात बसून मनसेचे आंदाेलन ; महापालिकेचा ढिसाळ कारभार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 01:11 PM2019-06-13T13:11:06+5:302019-06-13T13:12:08+5:30
बिबवेवाडी येथे पडलेल्या खड्यात बसून मनसेच्यावतीने अनाेेखे आंदाेलन करण्यात आले.
पुणे : बिबवेवाडी येथील रस्त्याच्या मध्ये डांबर खचून पडलेल्या खड्यात बसून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने अनाेखे आंदाेलन करण्यात आले. या भागातील ड्रेनेजचे काम दाेन दिवसांपूर्वी पूर्ण करण्यात आले हाेते. त्यानंतर रस्ता डांबर टाकून पुर्ववत करण्यात आला हाेता. परंतु पुण्यात झालेल्या पहिल्याच पावसात हा रस्ता खचल्याने महापालिकेचा ढिसाळ कारभार समाेर आला आहे. त्यामुळे या विराेधात मनसे स्टाईल आंदाेलन करण्यात आले.
बिबवेवाडी येथे चार महिन्यांपासून सुरु असलेले ड्रेनेजचे काम चार दिवसांपूर्वी पूर्ण करण्यात आले. त्यानंतर पालिकेकडून रस्ता पूर्ववत करण्यात आला. पुण्यात दाेन दिवसांपूर्वी झालेल्या पावसात हा रस्ता खचला. सुदैवाने यात कुठलिही दुर्घटना घडली नाही. या ठिकाणापासून जवळच विद्या निकेतन शाळा आहे. त्यामुळे जर कुठली दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार काेण असा सवाल करत मनसेच्या वतीने हे आंदाेलन करण्यात आले. अधिकारी वर्ग ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोपही यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. हा रहदारीचा रस्ता खचल्यानंतर पालिकेचा कुठलेही अधिकारी घटनेच्या ठिकाणी फिरकले ही नाहीत.
यावेळी सर्वाेत्कृष्ट कामाचा सर्वाेत्कृष्ट खड्डा असे लिहीलेला फ्लेक्स देखील या ठिकाणी लावण्यात आला हाेता. तसेच खचलेल्या डांबराला हार देखील घालण्यात आला हाेता.