पुण्यात मनसेचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; बैठकीदरम्यान पदाधिकाऱ्यांमध्ये हातापायी आणि गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 01:36 PM2022-05-19T13:36:08+5:302022-05-19T13:49:01+5:30
राज ठाकरेंनी पाठ फिरवताच पुण्यातील मनसेच्या पदाधिकऱ्यांचा वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले आहे.
पुणे : राज ठाकरे गेल्या दोन दिवसात पुणे दौऱ्यावर होते. पक्षातील अंर्तगत वादाचा मुद्दा आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यासाठी ते पुण्यात आले होते. तसेच पुण्यात २१ ते २८ मे दरम्यान राज ठाकरेंच्या सभेचे आयोजन केले आहे. त्यामध्ये २१ तारखेला सभा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु पावसाचे कारण देऊन ही सभा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर राज ठाकरे मुंबईच्या दिशेने रवाना झाले. राज ठाकरेंनी पाठ फिरवताच पुण्यातील मनसेच्या पदाधिकऱ्यांचा वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले आहे.
शिवाजीनगर विभाग अध्यक्ष रणजित शिरोळे आणि विद्यार्थी सेनेचे शैलेश वीटकर यांच्यात मनसे कार्यालयात झालेली बाचाबाची आणि हातापायी यामुळे विविध चर्चाना उधाण येऊ लागले आहे. पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अजूनही सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. पुण्यातील मनसेचे पदाधिकारी एकीकडे आणि मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे एकीकडे असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. कारण मनसेच्या कुठल्याच बैठकीला वसंत मोरे हजर राहत नाहीत. रविवारी झालेल्या पक्ष मेळाव्यानिमित्त छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेवर वसंत मोरे यांचं नाव टाकलं नव्हते. त्यामुळे वसंत मोरे ही नाराज असल्याच्या ही चर्चा होत्या. त्यानंतर आज मनसेच्या पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीवेळी मनसेचे पदाधिकारी रणजित शिरोळे आणि कार्यकर्त्यांमध्ये हातापायी झाली.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु होती. यावेळी शैलेश विटकर यांनी थेट विचारणा केली, आम्हाला बैठकील का बोलावले जात नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळं शिवाजीनगर विभाग अध्यक्ष रणजित शिरोळे आणि शैलेश विटकर यांच्यात वादावादी सुरु झाली. हा वाद हातापायी पर्यंत गेला. संतप्त कार्यकर्त्यांकडून गोंधळ सुरू झाला होता. मात्र हा किरकोळ वाद झाल्याचा दावा मनसे पदाधिका-यांकडून करण्यात आला.