साहित्य संमेलन स्पेशल ट्रेन तिकीटाचा तिप्पट दर..! मनसेकडून मोफत प्रवासाची मागणी
By राजू इनामदार | Updated: January 25, 2025 17:41 IST2025-01-25T17:40:51+5:302025-01-25T17:41:56+5:30
मोफत रेल्वे सोडण्याची मागणी: मुख्यमंत्री, पुण्यातील मंत्ऱ्यांवर टीका

साहित्य संमेलन स्पेशल ट्रेन तिकीटाचा तिप्पट दर..! मनसेकडून मोफत प्रवासाची मागणी
पुणे: दिल्लीत २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. दिल्लीला जाण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने तीनपट दर आकारून रेल्वेगाडी सोडली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर टीका केली असून रेल्वे मंत्रालयाने मराठी साहित्य रसिकांसाठी मोफत रेल्वे सोडावी अशी मागणी रेल्वे विभागाकडे केली आहे. याची दखल घेतली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही मनसेने दिला आहे.
सरहद संस्था दिल्लीतील संमेलनाची संयोजक आहे. संमेलन परराज्यात असेल तर सर्वसाधारणपणे रेल्वेकडून सवलतीच्या दरात जादा गाडीची व्यवस्था केली जाते. मात्र यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांना यासंबधीची व्यवस्था पाहणाऱ्यांना, रेल्वे आता विनामुल्य गाडी देत नाही, उलट जादा गाडी आरक्षित केली तर त्यासाठी तीनपट दर द्यावा लागतो असे सांगून त्याचपद्धतीने गाडी दिली आहे. यालाच मनसेने आक्षेप घेतला आहे. यापुर्वी घुमान संमेलनासाठी रेल्वेने विनामुल्य जादा गाडी उपलब्ध करून दिली होती. अयोध्या दर्शनसाठीही सवलतीच्या दरात जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. सध्या सुरू असलेल्या कुंभमेळ्यासाठीही रेल्वेने विशेष व्यवस्था करून जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे. असे असताना केंद्र सरकारने ज्या भाषेला अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जा दिली त्याच भाषेच्या गौरवासाठी मागील ९७ वर्षे होत असलेल्या अखिल भारतीय संमेलनासाठी गाडी सोडली जात नाही म्हणजे काय? असा प्रश्न मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांनी रेल्वे उपविभागीय कार्यालयाला दिलेल्या पत्रात केला आहे.
हा मराठी भाषेची उपेक्षाच नाही तर अवमान करण्याचा प्रकार असल्याचे संभूस यांनी म्हटले आहे. वास्तविक राज्याच्या मुख्यमंत्ऱ्यांनी याबाबतीत तातडीने रेल्वे मंत्ऱ्यांबरोबर बोलायला हवे होते. आयोजक संस्था पुण्याची आहे. ती आर्थिक देणग्यांमधूनच संमेलन करणार आहे. संमेलनाला जाऊ इच्छिणारे मराठी साहित्यिक व साहित्यरसिकही फार काही धनवान नसतात. हे लक्षात घेऊन पुणेकर असलेले केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार प्रा.डॉ. मेधा कुलकर्णी, राज्याचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ या मंत्ऱ्यांनीही त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, मुख्यमंत्ऱ्यांच्या ही बाब लक्षात आणून द्यायला हवी असे मत संभूस यांनी व्यक्त केले. मनसे मराठी भाषेची ही उपेक्षा सहन करणार नाही. रेल्वे मंत्रालयाने याची दखल घ्यावी, एक १८ डब्यांची जादा गाडी खास साहित्य संमेलनासाठी म्हणून सोडावी, अन्यथा रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा पत्रात देण्यात आला आहे.