Amit Thackeray: "मी संजय राऊतांची रिप्लेसमेंट नाही बरं का...", अमित ठाकरे असं का म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 01:40 PM2022-08-13T13:40:29+5:302022-08-13T13:41:05+5:30
मनसेच्या विद्यार्थी संघटनेच्या पुनर्बांधणी निमित्तानं मनसे नेते अमित ठाकरे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे यांनी आज पुणे पत्रकार संघ येथे मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
पुणे-
मनसेच्या विद्यार्थी संघटनेच्या पुनर्बांधणी निमित्तानं मनसे नेते अमित ठाकरे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे यांनी आज पुणे पत्रकार संघ येथे मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर प्रसारमाध्यमांनाही प्रतिक्रिया दिली. राज्यातील तरुणाईच्या रोजगाराचा आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा मानस अमित ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. पण मनसेच्या एका कार्यकर्त्यांनं विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात अमित ठाकरेंनी दिलेलं उत्तर लक्षवेधी ठरलं आहे.
...तर राजकारणात कधीच आलो नसतो; अमित ठाकरेंनी युवकांना स्पष्टच सांगितले
अमित ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पण या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी किंवा सामान्य जनतेशी थेट संवाद साधताना दिसत नाहीत. तुम्ही बातमी द्यायला हवी, अशी भावना एका मनसे कार्यकर्त्यानं अमित ठाकरेंकडे व्यक्त केली. त्यावर अमित ठाकरेंनी संजय राऊत सगळं पुरवतात ना? असं म्हटलं. पण संजय राऊत सध्या तुरुंगात आहेत असं मनसेच्या कार्यकर्त्यानं उत्तर दिलं. त्यावरही लागलीच अमित ठाकरेंनी मिश्किलपणे ''मी संजय राऊतांची रिप्लेसमेंट नाही बरं का'', असं म्हटलं.
VIDEO: "मी संजय राऊतांची रिप्लेसमेंट नाही बरं का...", अमित ठाकरेंच्या विधानानं एकच हशा पिकला! pic.twitter.com/YzNdWjat2Z
— Lokmat (@lokmat) August 13, 2022
"राज्यकर्त्यांनी खरंतर सगळ्याच प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवं. पण सध्या काहीच होत नाहीय. मी विद्यार्थ्यांसाठी फिरतोय. त्यांच्याशी संवाद साधतोय आणि त्यांचे प्रश्न जाणून घेतोय", असं अमित ठाकरे म्हणाले.
विद्यार्थ्यांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवणार
"रोजगार, आरक्षण आणि स्पर्धा परीक्षा यात विद्यार्थ्यांना समस्या भेडसावत आहेत. या सोडवण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात मनविसेची शाखा असायला हवी. यामुळं माझा आणि त्यांचा संपर्क व्हायला हवा. त्यासाठी मी सध्या प्रयत्नशील आहे. त्याच अनुषंगानं मी हा दौरा करतोय", असं अमित ठाकरे म्हणाले.
राज्यात जे सत्ताबदल झालं, त्याबाबद्दल अमित ठाकरेंना काय वाटतं?
सत्ता बदलाचे मला काही वाटत नाही. मी बातम्या वाचतच नाही. माझं फोकस क्लिअर आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवायचे. यासाठी मी स्वतः विद्यार्थ्यांना उपलब्ध होईन. यासाठी माझा नंबर त्यांना देतोय, असं अमित ठाकरे म्हणाले.
सध्याचं राजकारण पाहता युवकांनी राजकारणात का यावं का?
"मी पण तेच सांगतोय की, मी जर राज ठाकरेंचा मुलगा नसतो तर राजकारणात कधीच आलो नसतो. मला लोकांसाठी काम करायला आवडतं. पण ही आवड असली तरी सध्याच राजकारण पाहता मी कधीच राजकारणात आलो नसतो. मात्र माझ्यासाठी राज साहेबांनी प्लॅटफॉर्म तयार करून दिलंय. त्यामुळे दौरे करतोय अन युवकांचा प्रतिसाद मिळतोय", असं अमित ठाकरे म्हणाले.