Rupali Patil: 'पक्षातील काही नेत्यांनी ठरवूनच काटा काढला'; रुपाली पाटलांनी उघडपणे केला होता आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 11:17 PM2021-12-14T23:17:02+5:302021-12-14T23:44:11+5:30

रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil) यांनी मनसेला 'जय महाराष्ट्र' केल्याने राजकारणात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. 

MNS leader Rupali Patil had repeatedly accused some MNS party leaders. | Rupali Patil: 'पक्षातील काही नेत्यांनी ठरवूनच काटा काढला'; रुपाली पाटलांनी उघडपणे केला होता आरोप

Rupali Patil: 'पक्षातील काही नेत्यांनी ठरवूनच काटा काढला'; रुपाली पाटलांनी उघडपणे केला होता आरोप

googlenewsNext

पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष रुपाली पाटील- ठोंबरे (Rupali Patil)  यांनी आपला सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान नव्या पक्षातील प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसात त्या घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मनसेप्रमुखराज ठाकरे (Raj Thackeray) बुधवारपासून पुणे दौऱ्यावर आहेत. परंतु त्याआधीच रुपाली पाटील  ठोंबरे यांनी मनसेला 'जय महाराष्ट्र' केल्याने राजकारणात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. 

रूपाली पाटील या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. तसेच मनसेच्या महिला विभागाच्या पुणे शहराध्यक्ष म्हणून त्या कार्यरत होत्या. मंगळवारी त्यांनी आपला राजीनामा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सादर केला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून त्यांना ऑफर असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.

रुपाली ठोंबरे यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा दिला आहे. मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे, असं रुपाली ठोंबरे यांनी स्पष्टपणे पत्रात लिहिलं आहे. तसेच आपले आशीर्वाद आणि "श्री.राज ठाकरे" हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल' अशी भावना व्यक्त करत ठोंबरे यांनी राजीनामा दिला आहे.

तत्पूर्वी, विधानसभेच्या २०१९ निवडणुकीत रुपाली पाटील कसबा मतदारसंघातून मनसेकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक होत्या. मात्र त्यांच्याऐवजी तेव्हाचे मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांना उमेदवारी मिळाली आणि रुपाली पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. भाजपच्या नेत्यांशी सेटिंग करून आपले तिकिट कापल्याची भावना त्यांच्या मनात होती. रुपाली यांची नाराजी ओळखून पक्षाने त्यांच्यावर महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली, ती पार पाडताना त्या अधिक आक्रमक झाल्या. 

पुणे पदवीधर मतदारसंघातूनही रुपाली पाटील यांनी नशिब आजमविले. मात्र, त्या पराभूत झाल्या. या निवडणुकीत पक्षाच्या नेत्यांनी 'मनसे' साथ दिली नसल्याची खंत त्या खासगी बोलून दाखवत होत्या. पक्ष सोडण्याच्या विचारापर्यंत आलेल्या रुपाली पाटील यांच्याकडील महिला शहराध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेऊन प्रदेश उपाध्यक्षपद देऊन त्यांची बोळवण करण्यात आली. मात्र, हे पद काढण्याआधी काही मिनिटेच कल्पना दिली आणि खरेतर पक्षातील काही नेत्यांनी ठरवूनच काटा काढल्याचा आरोप रुपाली यांनी उघडपणे केला होता.

दरम्यान, राजीनामा देण्याआधी रुपाली या युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांची सह्याद्री अतिथिगृहात भेट घेऊन चर्चा केल्याने त्या शिवसेनेत जाणार, याची चर्चा रंगली आहे. सरदेसाई यांच्या आधी रुपाली पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही भेटल्या आणि राष्ट्रवादीतील प्रवेशाचा मुहूर्तही ठरल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे रुपाली या आपल्या मनगटावर घड्याळ की शिवबंधन याकडे लक्ष लागले आहे. 

Web Title: MNS leader Rupali Patil had repeatedly accused some MNS party leaders.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.