मनसेच्या नेत्या ॲड. रुपाली पाटील यांच्यावरील स्थानबद्धतेची कारवाई न्यायालयाने फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 03:31 PM2020-09-08T15:31:35+5:302020-09-08T16:46:47+5:30

राजकीय कार्यकर्त्यांवर स्थानबद्धतेच्या कारवाईचा निषेध

MNS leader Rupali Thombre Patil arrested by police in Pune | मनसेच्या नेत्या ॲड. रुपाली पाटील यांच्यावरील स्थानबद्धतेची कारवाई न्यायालयाने फेटाळली

मनसेच्या नेत्या ॲड. रुपाली पाटील यांच्यावरील स्थानबद्धतेची कारवाई न्यायालयाने फेटाळली

googlenewsNext

पुणे : जम्बो हॉस्पिटलमधील अनागोंदी विरोधात आंदोलन केल्याने शिवाजीनगर पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्ष रुपाली ठोंबरे पाटील यांना अटक करुन केलेली स्थानबद्धतेची कारवाई न्यायालयाने फेटाळून लावली. 

सीओईपी मैदानावर उभारण्यात आलेल्या जम्बो सेंटरच्या कारभाराविरोधात ५ सप्टेंबर रोजी आंदोलन केले होते. त्यावेळी रुपाली पाटील या गेटवर चढून आत गेल्या होत्या. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी रुपाली पाटील यांना अटक करुन न्यायालयात हजर केले़ त्यांच्यावर यापूर्वी खडक, विश्रामबाग, हिंजवडी, बिबवेवाडी, डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. शरीराविरुद्ध व दंगा मारामारीचे गुन्हे दाखल असून त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांच्यामध्ये काही एक सुधारणा झाली नाही.  यापुढेही त्यांच्याकडून अशा प्रकारचे कृत्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कायदा व सुव्यवस्थेचा भंग होण्याची दाट शक्यता वाटत असल्याने त्यांना ८ ते २१ सप्टेंबरपर्यंत १४ दिवस स्थानबद्ध करण्याबाबत आदेश देण्याची न्यायालयाला विनंती करण्यात आली. 

राजकीय कार्यकर्त्यांवर गुंडाविरोधात करायची कारवाई केल्याने त्याचा सोशल मिडियावर निषेध होऊ लागला होता. यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस. राणे यांनी पोलिसांची कारवाई फेटाळून लावली. रुपाली पाटील यांच्याविरुद्ध अशाप्रकारचे गुन्हे यापूर्वी दाखल झाले असले तरी त्यासाठी सीआर पीसी १५१ (३) ची कारवाई करणे योग्य होणार नाही. यापुढे अशा प्रकारे गुन्हे करणार नाहीत, असे हमीवर त्यांची न्यायालयाने सुटका केली. 

रुपाली पाटील यांच्यावतीने अ‍ॅड़ विजयसिंह ठोंबरे यांनी काम पाहिले. जम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे मृत्यु होत आहेत. एका पत्रकाराला आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशावेळी प्रशासनाला जाब विचारणाऱ्या विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार पोलिसांमार्फत करीत आहेत. त्याचा आम्ही निषेध करत आहोत, असे रुपाली पाटील यांनी सांगितले.

Web Title: MNS leader Rupali Thombre Patil arrested by police in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.