मनसे नेते वसंत मोरे यांची पक्षात घुसमट; FB Post चर्चेत, पुन्हा नाराजीचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 09:42 AM2024-03-12T09:42:46+5:302024-03-12T09:43:25+5:30
वसंत मोरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एकनिष्ठ मानले जातात. मोरे यांच्यावर मनसे शहराध्यक्षपदाचीही जबाबदारी दिली होती.
पुणे - MNS Vasant More ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने एकीकडे राज ठाकरे विविध दौरे, मतदारसंघात भेटीगाठी घेतायेत. तर दुसरीकडे पुण्यातील मनसेतील नाराजी पुन्हा उफाळून आली आहे. मनसे नेते वसंत मोरे यांनी लिहिलेल्या एका FB पोस्टमुळे त्यांची पक्षात घुसमट होतेय का असा प्रश्न निर्माण झाला आहे. मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस शांत होतो असा उल्लेख त्यांच्या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
वसंत मोरे यांनी नेमकं काय लिहिलंय?
"एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो" असं वसंत मोरे यांनी पोस्ट केले आहे. त्यामुळे मोरे हे पक्षात नाराज असल्याचे पुन्हा दिसून येते. गेल्या काही महिन्यांपासून वसंत मोरे हे पुणे लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. सातत्याने त्याबाबत हे जाहीरपणे इच्छुक असल्याचे बोलत होते. परंतु पुणे मनसेचे अध्यक्ष साईनाथ बाबर यांनीही आपण पुण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले होते. यातच याआधीही वसंत मोरे यांनी पक्षातील स्थानिक नेत्यांकडून जाणुनबुजून डावललं जात आहे. कुठल्याही बैठकीला आमंत्रित केले जात नाही असं म्हटलं होते. त्यामुळे वसंत मोरे आणि त्यांची नाराजी पुण्यात चर्चेचा विषय बनली आहे.
नुकतेच कात्रजमधील एका कामानिमित्त वसंत मोरे हे बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवारांची भेट घ्यायला गेले होते. त्यावेळीही बऱ्याच वावड्या उठल्या. वसंत मोरे हे मनसेचे माजी नगरसेवक आहेत. पक्ष स्थापनेपासून कात्रज भागात वसंत मोरे यांनी मनसेचे नाव कायम ठेवले. सलग १५ वर्ष वसंत मोरे कात्रज भागात काम करतात. मागील विधानसभा निवडणुकीत मनसेने हडपसर भागातून वसंत मोरे यांना संधी दिली. परंतु त्यांना विजय मिळवता आला नाही.
दरम्यान, वसंत मोरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एकनिष्ठ मानले जातात. मोरे यांच्यावर मनसे शहराध्यक्षपदाचीही जबाबदारी दिली होती. परंतु राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याचे आंदोलन पुकारले तेव्हा वसंत मोरे यांनी थेट त्यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर वसंत मोरे यांना तात्काळ पुणे शहराध्यक्षपदावरून बाजूला केले आणि साईनाथ बाबर यांना शहराध्यक्ष बनवले. मात्र तेव्हापासून वसंत मोरे आणि मनसेच्या स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीनाट्य सुरू आहे.