एखाद्या लढाईला सेनापती नसला तर लढाई हरत नाही : वसंत मोरे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 12:54 PM2022-05-06T12:54:04+5:302022-05-06T12:54:40+5:30
पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) आंदोलनादरम्यान नॉट रिचेबल असल्याने उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या.
मशिदींवरील भोंग्यांविरोधात मनसेकडून आंदोलन करण्यात आलं. यानंतर पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातील अनेक ठिकाणी मनसैनिकांनी सक्रिय होत हनुमान चालीसा लावली. मात्र, या सगळ्या घडामोडींमध्ये गेले काही दिवस चर्चेत असणारे पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) नॉट रिचेबल असल्याने उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु आता खुद्द मोरे यांनी समोर या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
"या कालावधीत अनेक कार्यकर्ते संपर्कात होते. यापूर्वी ठाण्याची सभा होती. तेव्हा राज ठाकरे यांनी आदल्या दिवशी मला मुंबईला बोलावलं होतं. तेव्हा त्यांनी मला ठाण्याच्या सभेला येण्यास सांगितलं. तेव्हा राज ठाकरे समोरच असल्यामुळे मला त्यांना नाही म्हणता आलं नाही. यापूर्वी माझ्या घरी सर्व आलेले तेव्हा पाहिलं असेल घरी लग्नचा कार्यक्रम होता. ठाण्याच्या सभेला मला राज ठाकरेंनी बोलावल्यामुळे आधी लगीन कोंढाण्याचं प्रमाणे मी घरचा कार्यक्रम रद्द केला. मी घरच्यांनाही समजावलं. त्या ठिकाणी गेलो नाही, तर कार्यकर्त्यांमध्ये, पक्षात संभ्रम निर्माण होईल त्यामुळे कार्यक्रम टाळू शकत नाही असं घरच्यांना सांगितलं," अशी माहिती मोरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
"नंतर कार्यक्रम हा पहिलेच ठरला होता. मीदेखील माणूस आहे आणि मलाही भावना आहेत. मी दरवर्षी तिरूपती बालाजीला जात असतो," असंही ते म्हणाले. संपूर्ण पक्षाचे लोक या ठिकाणी होते. त्यामुळे एखाद्या लढाईला एखादा सेनापती नसला म्हणून कोणी लढाई हरत नाही. माझ्या अनुपस्थितीत आमचे महाराष्ट्र सैनिक, शहराध्यक्ष असतील ते सर्व रस्त्यावर होते असंही ते म्हणाले.