मनसे विधानपरिषद निवडणुकीत तटस्थ
By admin | Published: November 18, 2016 06:11 AM2016-11-18T06:11:18+5:302016-11-18T06:11:18+5:30
विधानपरिषदेच्या पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला.
पुणे: विधानपरिषदेच्या पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाची बदनामी नको या कारणारे हा निर्णय घेतला असल्याचे पालिकेतील गटनेते किशोर शिंदे यांनी सांगितले.
शिंदे तसेच पक्षाचे पुणे जिल्हा संपर्क नेते बाळा नांदगावकर, नगरसेवक राजेंद्र वागस्कर, रविंद्र धंगेकर, वसंत मोरे आदींची ठाकरे यांच्या समवेत बुधवारी सायंकाळी मुंबईत बैठक झाली. ठाकरे यांनी निवडणुकीतील मतदानाची माहिती घेतली. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. पक्षाच्या वतीने वागस्कर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र तो बाद झाला. त्यामुळे आता निवडणुकीत पक्षाचा उमेदवार नाही अशी माहिती त्यांनी ठाकरे यांना दिली.
आपला उमेदवार नाही, तरीही मतदान केले तर पक्षावर विनाकारण आरोप होत राहतील, त्यामुळे पक्षाने या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालावा असे ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे आता पक्षाचा जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी मतदान करणार नाही अशी माहिती शिंदे यांनी दिली. वागस्कर यांचा अर्ज बाद करण्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दावा दाखल केला होता, मात्र तो फेटाळण्यात आला असे त्यांनी सांगितले.
मनसेचे पुणे महापालिकेतील २९ नगरसेवकांसह पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ४, जून्नर २, आळंदी १, पुरंदर १ असे एकूण ३६ उमेदवार या निवडणुकीत मतदार आहेत. त्यांना कोणालाही आता मतदान करता येणार नाही. दरम्यान काही नगरसेवकांनी मध्यंतरी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पक्षाची कारवाई होऊन ६ वर्षे बाद होऊ या भितीने त्यांनी नंतर मनसेतच असल्याचे जाहीर निवेदन केले. ते आता काय भुमिका घेतात याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. न्यायालयाने या निवडणुकीसाठी गुप्त मतदान असेल व कोणत्याही पक्षाला व्हिप (पक्षादेश) काढता येणार नाही असा आदेश दिला आहे. (प्रतिनिधी)