पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या २१ जागांवर मनसेची तयारी; युतीबरोबर की स्वतंत्र, राज ठाकरे ठरवणार

By राजू इनामदार | Published: June 20, 2024 06:22 PM2024-06-20T18:22:34+5:302024-06-20T18:23:39+5:30

विधानसभेच्या शहरातील ८ जागांसह जिल्ह्यातील २१ जागांवर आमची तयारी सुरू आहे असे मनसेकडून सांगण्यात येत आहे...

MNS preparation for 21 Vidhan Sabha seats in Pune district; With alliance or independent, Raj Thackeray will decide | पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या २१ जागांवर मनसेची तयारी; युतीबरोबर की स्वतंत्र, राज ठाकरे ठरवणार

पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या २१ जागांवर मनसेची तयारी; युतीबरोबर की स्वतंत्र, राज ठाकरे ठरवणार

पुणेसन २०१९ पासून निवडणुकीच्या राजकारणापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते बाजूलाच होते. मात्र लोकसभेला महायुतीला पाठिंबा देताना ‘आता विधानसभेच्या तयारीला लागा’ या पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशामुळे सगळे मनसैनिक फुरफुरू लागले आहे. विधानसभेच्या शहरातील ८ जागांसह जिल्ह्यातील २१ जागांवर आमची तयारी सुरू आहे असे मनसेकडून सांगण्यात येत आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात काही पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या तयारीवरून त्याला पुष्टीही मिळत आहे. राज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काही कार्यक्रम घेण्यात आले तर त्याशिवाय राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरेल, नाव प्रकाशझोतात राहील असे काही कार्यक्रम करण्यात येत आहेत. नाशिक पाठोपाठ पुण्यात मनसेचे चांगले राजकीय वजन आहे. महापालिकेत मनसेचे २९ नगरसेवक होते. पुढच्या निवडणुकीत त्यांची संख्या २ झाली तरी त्यानंतर सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कोथरूड मतदारसंघात मनसेला ८० हजार मते मिळाली होती.

त्याशिवाय आता शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फूट झाली आहे. त्यांची राजकीय शक्ती विभागली गेल्याचा फायदा होईल असे मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच पुणे शहरातील ८ विधानसभा मतदारसंघांसह जिल्ह्यातील सर्व म्हणजे २१ मतदारसंघांमध्ये मनसैनिकांना घरोघरी संपर्क, लोकहिताची कामे, मनसेच्या ध्येयधोरणांना जनतेपर्यंत पोहोचवणे असे आदेश स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या मराठीच्या आग्रहाबरोबरच हिंदुत्वाच्या भूमिकेबाबत आग्रही राहण्यास त्यांना सांगण्यात आले आहेत.

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने पुण्यातून कसबा व कोथरूड विधानसभेला उमेदवार दिला होता, पण यश मिळाले नाही. महापालिकेची निवडणूक २ वर्षे झालीच नाही. कसबा विधानसभेची पोटनिवडणूक झाली त्यावेळी मनसे तटस्थ राहिली. लोकसभेला मनसेने महायुतीला पाठिंबा जाहीर केला, सभा घेतली, मात्र एकाही ठिकाणी उमेदवार दिला नाही. ‘किती काळ दुसऱ्यांना पाठिंबा द्यायचा व त्यांचाच प्रचार करायचा, आपली ताकद आपण पाहायची की नाही?’ असा प्रश्न आता मनसेच्या निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडूनही केला जात आहे. त्यामुळेच ‘आता विधानसभेच्या तयारीला लागा’ या पक्षाध्यक्ष ठाकरे यांच्या आदेशाचा शब्दश: अर्थ लावून शहरातील कोथरूड, कसबा, खडकवासला तसेच जिल्ह्यातीलही काही मतदारसंघात मनसेचे इच्छुक खरोखरच तयारीला लागले आहेत.

विधानसभेसाठी मनसे महायुतीबरोबर राहील असे मनसेच्या कोणाही पदाधिकाऱ्याला वाटत नाही. तसे झाले तर त्यांच्याकडून जागा वाटपात अन्याय होईल याची जणू मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही खात्रीच आहे. राज ठाकरे मुंबई, नाशिक येथील मोजक्या जागा सहन करणार नाहीत असे त्यांना वाटते. स्वतंत्रपणे लढावे व महायुतीतील मतभेदांचा फायदा घ्यावा असे या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे असल्याचे दिसते. त्यातून किमान मनसेची राजकीय ताकद किती आहे, कुठे काम करावे लागेल, कुठे संघटन वाढवावे लागेल ते तरी निदर्शनास येईल असे मत काही पदाधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर व्यक्त केले.

आम्ही जिल्ह्यातील सर्व जागा टार्गेट केल्या आहेत. युती ठेवायची की नाही? ठेवलीच तर कोणत्या जागा घ्यायच्या? याचा अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचाच राहणार आहे. मात्र आपली तयारी असलीच पाहिजे या विचाराने आम्ही पुणे शहरातील ८ ही तसेच जिल्ह्यातील अन्य जागांवरही तयारी सुरू केली आहे.

राजेंद्र (बाबू) वागसकर- मनसे नेते

 

Web Title: MNS preparation for 21 Vidhan Sabha seats in Pune district; With alliance or independent, Raj Thackeray will decide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.