मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुन्हा पुणे दौऱ्यावर; पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत दोन दिवस बैठका घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 10:51 AM2021-08-13T10:51:36+5:302021-08-13T10:57:30+5:30
बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार
पुणे : जुलै महिन्यापासून राज ठाकरे यांचे तीन पुणे दौरे झाले आहेत. आज पुन्हा चौथ्यांदा पुण्याला भेट देण्यासाठी आले आहेत. दोन दिवसीय दौऱ्यात राज ठाकरे पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. शिवाय बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत .राज ठाकरे हे 6 ऑगस्टलाही पुणे दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर आज पुन्हा दौऱ्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत.
मागच्या महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे ३० जुलैला पुण्यात दाखल झाले होते. त्यानंतर आज पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी दिली आहे. त्याआधीच्या आठवड्यात राज ठाकरे यांनी पुणे दौरा केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे १९, २० आणि २१ जुलै अशा तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरेंचा पुढचा पुणे दौराही ठरला होता. आठ दिवसांनी म्हणजे ३० जुलैला राज ठाकरे पुन्हा होती. त्यानंतर आता राज ठाकरे आज पुन्हा पुणे दौऱ्यावर आले आहेत.
पुणे महापालिकेच्या ९० जागांवर मनसेचं लक्षकेंद्रित
आगामी पुणे महापालिका निवडणुकीत मनसे सर्व जागा लढवणार आहे. त्यातील ९० जागांवर मनसेनं लक्ष केंद्रीत केल्याचं सांगतानाच ४५ जागा निवडून येणारच असा दावा मनसेचे नेते करत आहेत. दरम्यान, प्रभार रचनेमुळे पक्षाचे नगरसेवक कमी झाले असं मनसे नेते सांगतात. मात्र, शहरातील पक्ष संघटनेचा प्रभावही कमी झाला होता.
बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी
आज १३ ऑगस्टला बाबासाहेब पुरंदरे तिथीप्रमाणे वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती लावणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे मोदी पुरंदरेंना ऑनलाईन शुभेच्छा देणार आहेत. यावेळी राज ठाकरे कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
पुणे महापालिकेतील पक्षांच्या जागा
भाजप – ९९
राष्ट्रवादी – ४२
शिवसेना – १०
काँग्रेस – १०
मनसे – २
एमआयएम – १
एकूण जागा – १६४