Pune MNS: "राज साहेब आणि मनसेला शेवटचा जय महाराष्ट्र", पुण्यातून शहर उपाध्यक्षांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 11:11 AM2022-04-08T11:11:50+5:302022-04-08T11:12:16+5:30
शहराचे उपाध्यक्ष अझरुद्दीन बाशीर सय्यद यांनीसुद्धा मनसेला शेवटचा जय महाराष्ट्र सांगून राजीनामा दिला आहे
पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात राजकीय घडामोडींबरोबरच धार्मिक विषयांना हात घातला. महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला होता. त्यामुळं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. परंतु राज ठाकरेंनी मशीदवरील भोंग्यांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे पुण्यात मनसैनिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. पुण्यात मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी अडचणीत आल्याचे सांगितले होते. त्यानंतर ते शहराध्यक्ष पदावरुन ते बाजूला झाले. काल राज ठाकरेंच्या उपस्थितीत साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु पुण्यातून मनसेला अजून एक मोठा धक्का बसला आहे. शहराचे उपाध्यक्ष अझरुद्दीन बाशीर सय्यद यांनीसुद्धा मनसेला शेवटचा जय महाराष्ट्र सांगून राजीनामा दिला आहे. सय्यद यांनी नवनिर्वाचित शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना राजीनामा अर्ज पाठवला आहे. त्यांनंतर त्यांनी फेसबुक पोस्टही लिहिली आहे.
सय्यद म्हणाले, खरं तर कधी अशी परिस्थिती समोर येईल असं वाटलं नव्हतं. मात्र आपण ज्या पक्षात काम करतो, ज्या पक्षाला आपलं सर्वस्व समजतो तोच पक्ष जर आपण ज्या समाजातून येतो त्या समाजाच्या विरोधात द्वेषात्मक भूमिका घेत असेल. आणि स्वतः पक्षाध्यक्षच जर भुमीका घेत असतील तर नक्कीच पक्षाला शेवटचा 'जय महाराष्ट्र' म्हणण्याची वेळ आली आहे. बरं पक्षाध्यक्षांच्या भूमिकेला विरोध सोडा साधी नाराजी व्यक्त करायचा अधिकार नसावा? वसंत तात्या मोरेंना उभा महाराष्ट्र ओळखतो,काय चुकलं तात्यांच?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला का असल्या राजकारणाची गरज पडली?
फक्त पक्षाध्यक्षांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली म्हणून त्यांना काय वागणूक दिली गेली. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. काय केलं नाही वसंत तात्यांनी पक्षासाठी ते सांगा? जर त्यांच्यासोबत तुम्ही असे वागत असाल तर आमचं तर न बोलेलंच बर! ब्लु प्रिंट,विकासाच्या भव्य दिव्य गोष्टी एक दिवशी अचानक मशिदीवरील भोंगे आणि मदरस्यावर येऊन थांबतात. तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता म्हणून काहीतरी चुकीचं घडतंय हे सहज लक्षात येऊन जात. पक्ष स्थापन झाला तेंव्हा भूमिका होती की जातीपाती विरहित राजकारण करायचं. म्हणून सर्व जाती धर्माचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षात होते. आणि जीवतोड मेहनत देखील करत होते. पक्षाचा झेंडा देखील सर्वसमावेशक होता.राज साहेब ठाकरे म्हणजे आशेचा एक नवा किरण होते मात्र पाडव्याच्या सभेत वेगळंच काहीतरी पाहायला आणि ऐकायला भेटलं! म्हणे मदरस्यात छापे मारा पहा काय काय मिळत! राज साहेब कित्येक गोरगरिबांच्या मुलांचे मी मदरस्यात प्रवेश करून दिलेत. आपल्या पक्षाच्या नावाने देणग्या देखील दिल्या.तिथे कधीच काही चुकीचं होत नाही. नसेल तर माझ्या सोबत चला मी दाखवतो तुम्हाला मदरसे. मात्र बदनामी का करता? मुस्लिम द्वेषाच्या धंद्यांवर भाजपाच राजकारण चालतं. त्यांना मशिदच्या भोंग्या पासून त्रास होतो, मदरस्यानां बदमान करायचं काम त्यांचं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला का असल्या राजकारणाची गरज पडली? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
एखाद्या समाजाला टार्गेट करून राजकारण करणं चुकीचं
एखाद्या समाजाला टार्गेट करून राजकारण करणं चुकीचं आहे. आणि त्या चुकीच्या गोष्टीत त्याच पीडित समाजाचा भाग म्हणून सहभागी होणे म्हणजे स्वतःशीच बेईमानी करण्यासारख आहे. त्यामुळे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि पुणे शहर उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. वसंत त्यात्यांसोबत जे झालं ते एक कार्यकर्ता म्हणून आणि एक नागरिक म्हणून देखील अजिबात पटणार नाहीये. फक्त पुणेच नाही तर उभ्या महाराष्ट्राला वसंत तात्यांसोबत झालेल्या प्रकारच वाईट वाटलं आहे. वसंत मोरे म्हणजे सर्वसामान्य लोकांच काम करणारा आणि पक्षावर प्रचंड निष्ठा असणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.मात्र त्यांना साधी नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार नसावा हे दुर्दैवी आहे! असो, राज साहेबांना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शेवटचा 'जय महाराष्ट्र'....!