MNS Raj Thackeray : "शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असेल तर यापलीकडे काय बोलायचं?"; राज ठाकरेंचं टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 12:33 PM2022-05-22T12:33:44+5:302022-05-22T12:55:55+5:30
MNS Raj Thackeray And NCP Sharad Pawar : "महाराष्ट्रातली जनता बेपर्वा वागते. निवडणुकीच्या तोंडावर सगळ्या गोष्टी विसरायच्या आणि भलत्याच गोष्टीवर मतदान करायचं" असंही म्हटलं आहे.
पुणें - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी शरद पवारांवर (NCP Sharad Pawar) जोरदार निशाणा साधला आहे. "आमच्या शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असेल, तर यापलीकडे काय बोलायचं?" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच "हे सत्तेत इतके मश्गूल आहेत की यांना कशाची पर्वा नाहीये. कारण महाराष्ट्रातली जनता बेपर्वा वागते. निवडणुकीच्या तोंडावर सगळ्या गोष्टी विसरायच्या आणि भलत्याच गोष्टीवर मतदान करायचं" असंही म्हटलं आहे.
"शिवसेनेचा तिथला खासदार पडला आणि एमआयएमचा निवडून आला. आमच्याच महाराष्ट्रात एमआयएमची औलाद येते आणि जो आमच्या शिवछत्रपतींना मारण्यासाठी आग्र्याहून निघाला त्या औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवतात. आणि आम्हाला लाज वाटत नाही. सत्ताधारीच असे बसले आहेत. आता आमच्या शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असेल, तर यापलीकडे काय बोलायचं? अफजलखान शिवाजी महाराजांना मारायला आलाच नव्हता म्हणे"असं म्हणत राज ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे.
"तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलताय? यांचं राजकारण तुम्ही समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक वेळी तुम्हाला गृहीत धरून हे चालणार. काल शिवसेनेतलं कुणी बोललं की महाविकास आघाडी सरकार हे पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता. याच्यावर कहर म्हणजे शरद पवार म्हणतायत आम्ही सकाळी भांडायचो आणि संध्याकाळी जेवायला एकत्र बसायचो. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची क्रेडिबिलिटी घालवताय. शिवसेनेला कळत नाहीये की तुम्ही कुणाबरोबर राहात आहात. लोकांना वाटेल यांचं खोटं खोटं भांडण चालायचं" असं म्हणत राज ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यामध्ये जाहीर सभा झाली. याच दरम्यान त्यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. निवडणुका नसताना उगाच कशाला भिजत भाषण करायचं असं म्हणत निशाणा साधला आहे. "आपल्या सभांना हॉल वगैरे परवडत नाही. पण मी पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं की एसपी कॉलेज बघा. त्यांनी नकार दिला. आता आम्हाला नाही तर कुणालाच नाही. नदीपात्राचा विषय झाला. पण एकूणच सध्याचं हवामान पाहाता कोणत्याही वेळी पाऊस पडेल अशी चिन्ह दिसतायत. मी म्हटलं निवडणुका नाहीत, काही नाही, उगीच कशाला भिजत भाषण करा" असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.