पुणे महापालिका निवडणुकीत ताकदीने उतरण्यासाठी मनसे तयार; '३' दिवसांच्या दौऱ्यासाठी राज ठाकरे पुण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 10:47 AM2021-07-28T10:47:54+5:302021-07-28T10:51:50+5:30
सकाळीच ९.३० च्या सुमारास राज ठाकरे नवी पेठेतील पक्षाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांचा पंधरा दिवसांच्या आत हा दुसरा तीन दिवसांचा दौरा आहे
पुणे : फेब्रुवारीत होणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत संपूर्ण ताकदीने उतारण्यासाठी मनसेने तयारी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आजपासून तीन दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असणार आहेत.
सकाळीच ९.३० च्या सुमारास राज ठाकरे नवी पेठेतील पक्षाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांचा पंधरा दिवसांच्या आत हा दुसरा तीन दिवसांचा दौरा आहे. त्यामुळे मनसे येणाऱ्या निवडणुकीत किती नगरसेवक निवडून आणणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सध्या पुणे महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांचेही बऱ्यापैकी नगरसेवक आहेत. त्यामुळे मनसे यंदाच्या निवडणुकीत नगरसेवकांची संख्या दोन अंकी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे स्वतः पदाधिकारी निवडण्यासाठी मुलाखती घेणार आहेत.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे नाशिक मुंबईकडे लक्ष देणार आहे. राज ठाकरे यांनी नुकताच पुण्यात तीन दिवस मुक्काम करून सर्व मतदारसंघातील पदाधिकारी, माजी नगरसेवक, प्रभागप्रमुख आदींशी चर्चा केली. त्यानुसार २८ ते ३० जुलै असा तीन दिवसीय दौरा निश्चित करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत कसबा, पर्वती आणि हडपसर या मतदारसंघाच्या मुलाखती होणार आहेत. गुरुवारी शिवाजीनगर, कोथरूड आणि कँटोन्मेंट मतदारसंघाच्या व शुक्रवारी खडकवासला, वडगावशेरी मतदारसंघाच्या मुलाखती होणार आहे.