राज ठाकरेंच्या सभेसाठी मनसे मैदानांच्या शाेधात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 02:23 PM2019-10-06T14:23:07+5:302019-10-06T14:26:48+5:30
शहरातील शैक्षणिक संस्थांची मैदाने सभेसाठी मिळत नसल्याने अलका चाैकात सभा घेण्याची परवानगी मनसेकडून पाेलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
पुणे : विधानसभेच्या निवडणुकांसाठी आता अवघे काही दिवस उरलेले असताना सर्वच पक्ष प्रचारासाठीची तयारी करत आहेत. मनसेकडून शहरात अनेक ठिकाणी उमेदवार उभे करण्यात आले असल्याने मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या सभांचे आयाेजन शहरात करण्यात येणार आहे. परंतु राज ठाकरेंच्या सभांसाठी पुण्यातील मैदाने उपलब्ध हाेत नसल्याने मनसेचे कार्यकर्ते चिंतेत आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे अलका चाैकामध्ये राज ठाकरे यांची सभा घेऊ देण्याची परवानगी मनसेकडून पाेलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
विधासभेच्या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांच्या सभांना येत्या आठवड्यापासून सुरवात हाेणार आहे. परंतु या सभा घेण्यासाठी शहारातील विविध भागांमध्ये मैदाने मिळत नसल्याचे चित्र आहे. राज ठाकरे यांची 9 ऑक्टाेबरला पुण्यात सभा हाेणार आहे. परंतु त्यांच्या सभेसाठी मैदाने मिळत नसल्याने अलका चाैकात सभा घेऊ देण्याची मागणी मनसेकडून पाेलिसांना करण्यात आली आहे.
साेमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट हाेणार आहे. रविवारी एमआयएमचे असुद्दीन ओवेसी यांची सभा झाल्यानंतर बुधवारी राज ठाकरे यांची सभा हाेणार आहे. परंतु ठाकरे यांच्या सभेसाठी मध्य वस्तीतील मैदाने उपलब्ध हाेत नसल्याची तक्रार मनसेने केली आहे. ठाकरे यांच्या सभेसाठी मध्यवस्तीतील शैक्षणिक संस्थांच्या मैदानावर सभा घेण्याची परवानगी मागण्यात आली हाेती. परंतु त्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. काही संस्थांनी तुमच्या सभेसाठी जागा देता येणार नाही असा पवित्रा घेतला आहे.
शहरातील शैक्षणिक संस्थांवर सध्या सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांचे वर्चस्व आहे. त्यामुळे इतर राजकीय पक्षांना सभांसाठी मैदानेच मिळत नाहीत असा आराेप मनसेचे शहराध्यक्ष आणि कसबा विधानसभा मतदार संघातील मनसेचे उमेदवार अजय शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांची मैदाने उपलब्ध हाेत नसतील तर पूर्वीप्रमाणे अलका चाैकामध्ये सभा घेण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी मनसेकडून पाेलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.