'पुणे कोणाच्या बापाचं नाय' हे मनसेनं लक्षात ठेवावं; श्रीमंत कोकाटेंचे वसंत मोरेंना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 11:00 AM2021-08-17T11:00:00+5:302021-08-17T11:00:13+5:30
प्रवीण गायकवाड यांना पुण्यात फिरून न देणे हेही हास्यास्पदच
पुणे : देशात लोकशाही आहे. आपल्याकडे अफगाणिस्तान सारखं तालिबानी राज्य आलेले नाही. राज ठाकरेंना दादर मध्ये फिरू देणार नाही हे हास्यास्पद आहे. तसेच प्रवीण गायकवाड यांना पुण्यात फिरून न देणे हेही हास्यास्पदच आहे. गायकवाड हेही पुण्याचेच आहेत ना? त्यामुळे पुणे कोणाच्या बापाचं नाय हे मनसेने लक्षात ठेवावं. असं प्रत्यत्तर श्रीमंत कोकाटे यांनी वसंत मोरे यांना दिले आहे. एका माध्यमाला प्रतिक्रिया देत असताना ते बोलत होते.
मनसेच्याराज ठाकरेंना वाटत असेल की पुरंदरेना लोटांगण घातले म्हणून आपण खूप मोठे झालो. तर अशा भ्रमात राहू नका. मी प्रवीण गायकवाड यांच्या भूमिकेचे समर्थन करतो असेही ते म्हणाले आहेत.
बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवचरित्र लेखनावरही कोकाटे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, आपल्या राज्यात ज्या धार्मिक दंगली झाल्या याला बाबासाहेबांचा शिवचरित्र कारणीभूत आहे. पुरंदरेंनी जिजाऊ आणि शिवरायांची बदनामी करणारी पार्श्वभूमी तयार केली. हे मनसेला मान्य असेल तर त्यांनी महाराष्ट्र समोर पुढे येऊन ते जाहीर करावं. पुरंदरेंच सातत्याने समर्थन करतात हे महाराष्ट्राला पटत नाही. लेखनाच समर्थन करणारा व्यक्ती महाराष्ट्राचा शत्रू असल्याचं ते म्हणाले आहेत.
प्रविण गायकवाड यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर पुण्यातील मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेचे पुणे शहर अध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे म्हणाले की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून इच्छुक असणारा तू मी स्वत: गल्लोगल्ली फिरताना तुला पाहिलंय. मी प्रविण गायकवाड, असं सांगत होतास. तुला राज ठाकरे काय कळणार? लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यावर कोकाटे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
प्रविण गायकवाड काय म्हणाले होते?
राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला राज ठाकरे हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे. त्यांना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केली आहे.
'परंतु हा संघर्ष उभा करत असताना त्यांना १८९९ ते १९९९ या शंभर वर्षाच्या काळात महाराष्ट्रात झालेल्या सांस्कृतिक संघर्षाचा आणि आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या वारशाचा विसर पडला आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. त्यांची सध्याची जी काही मांडणी आहे, ती प्रबोधनकार ठाकरेंच्या ब्राह्मणेतर विचारांपासून फारकत घेणारी आणि पुरंदरेंच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या विचारणसरणीला जवळ करणारी आहे हे मात्र नक्की ! असेही ते म्हणाले आहेत.
राज ठाकरेंनी काय म्हटलं होतं?
महाराष्ट्रात आधीपासूनच जात ही गोष्ट होती. मात्र स्वजातीचा अभिमान इतपतच ती मर्यादित होती. मात्र मागील २० वर्षांपासून लोक स्वत:च्या जातीच्या अभिमानासोबतच इतरांचा तिरस्कार करण्यापर्यंत पोहोचले आहेत आणि राजकीय स्वार्थातून हे सगळं केलं गेलं आहे. जातीचा मुद्दा हा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटीटीचा भाग झाला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच जातीचा मुद्दा हा सर्वार्थाने मोठा झाला आहे,' असं राज ठाकरे म्हणले होते.