राजकारणात एकमेकांपासून दुरावलेले वसंत मोरे अन् रुपाली पाटील ठोंबरे पुन्हा एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 12:43 PM2022-10-26T12:43:39+5:302022-10-26T12:44:13+5:30

१० महिन्यांनी पहिल्यांदाच आम्ही एकत्र भेटलो आहे. जे काही बोलणं व्हायचं ते फोनवरून होत होते अशी प्रतिक्रिया दोन्ही नेत्यांनी दिली.

MNS Vasant More and NCP Rupali Patil Thombare, who were separated from each other in politics, are together again for Diwali Bhaubij | राजकारणात एकमेकांपासून दुरावलेले वसंत मोरे अन् रुपाली पाटील ठोंबरे पुन्हा एकत्र

राजकारणात एकमेकांपासून दुरावलेले वसंत मोरे अन् रुपाली पाटील ठोंबरे पुन्हा एकत्र

googlenewsNext

पुणे - एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे वसंत मोरे आणि रुपाली पाटील ठोंबरे पुन्हा एकदा एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं. भाऊबीज सणानिमित्त हे दोघंही सण साजरा करण्यास भेटले होते. मागील डिसेंबर महिन्यात रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेचा राजीनामा देत अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर वसंत मोरे आणि रुपाली पाटील ठोंबरे यांची थेट भेट झाली नव्हती. 

मात्र दिवाळी सणानिमित्त भाऊबीज साजरा करण्यासाठी पहिल्यांदाच वसंत मोरे आणि रुपाली पाटील ठोंबरे एकत्र आले. १० महिन्यांनी पहिल्यांदाच आम्ही एकत्र भेटलो आहे. जे काही बोलणं व्हायचं ते फोनवरून होत होते. पण प्रत्यक्ष भेटण्याची वेळ कधी आली नव्हती. परंतु आज भाऊबीज सणानिमित्त आम्ही एकत्र आलो त्याचा आनंद वाटतो अशी प्रतिक्रिया मनसे नेते वसंत मोरे यांनी दिली. 

तर मनसेत तब्बल २००६ पासून २०२१ पर्यंत आम्ही एकत्र काम केले. मोठा भाऊ म्हणून मला वसंत मोरे यांनी खूप सांभाळून घेतले. पालिकेत एकत्र काम केले. रक्ताच्या नात्यासोबत ही नाती कमावलेली खूप महत्त्वाची असतात. राजकारणामुळे नात्यात कटुता येऊ नये असं वाटतं. मी पक्ष सोडल्यापासून कधी भेटणं झालं नव्हतं. तात्या मला बोलला त्याचा राग होता. पण भाऊ म्हणून त्याने जे सहकार्य केले ते विसरू शकत नाही असं राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटलं. त्याचसोबत सत्ता येते, जाते, मी राष्ट्रवादीत खुश आहे. माझा भाऊ आहे तसा भेटला त्यात आनंद आहे असंही त्यांनी सांगितले. मुंबई तकनं त्यांची विशेष मुलाखत घेतली. 

दरम्यान, मनसेत असताना रुपाली पाटील आणि राष्ट्रवादीत असलेल्या रुपाली पाटील यात खूप फरक आहे. माझ्या मुलावर जो प्रसंग आला तेव्हा मला फोन करून जे शब्द तिने दिले तेव्हाच माझा राग निघून गेला. आम्ही एकमेकांना टीव्हीवर पाहायचो. प्रत्यक्षात भेट झाली नाही. २०१२ पासून जास्त संबंध आले. मी तिला पद देण्यासाठी भांडलो आहे. पक्षांतर्गत अंतर्गत कुरघोडी झाली तेव्हाही अनेकदा पाठिशी राहिलो. माझी कायम मोठ्या भावाची भूमिका असायची. राजकारणात सहनशीलता महत्त्वाची असते. असा सल्लाही वसंत मोरे यांनी रुपाली पाटील ठोंबरे यांना दिला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: MNS Vasant More and NCP Rupali Patil Thombare, who were separated from each other in politics, are together again for Diwali Bhaubij

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.