मनसेचा नादच खुळा, कोविड रुग्णांची लूट थांबविण्साठी हॉस्पीटलबाहेरच झळकावले बॅनर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 04:49 PM2020-08-25T16:49:27+5:302020-08-25T16:51:24+5:30
शासनमान्य दराने देयकांची आकारणी केल्याबाबतची खात्री करण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यातील रुग्णालयासाठी लेखा अधिकाऱ्यांच्या पथकाची नियुक्ती केली आहे.
मुंबई - कोविड उपचारासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या हॉस्पीटलकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांबाबत मोठ्या प्रमाणात तफावत आढळल्याचे दिसून येत आहे. काही रुग्णांकडून लाखोंची बिले आकारण्यात येत असल्याचे सोशल मडियातून उघडकीस आले आहे. यासंदर्भात मनसेने प्रश्न लावून धरल्यानंतर राज्य सरकारने बिलांच्या तपासणीसाठी लेखा परीक्षकांची नेमणूक केली आहे. मात्र, एक दिवसाची बातमी होऊन गेली, पुन्हा जनजागृती नाही किंवा रुग्णालयाबाहेर या अधिकाऱ्यांची माहितीही नाही. आता, पुण्यातील मनसेनं 25 रुग्णालयाबाहेर बॅनर झळकावले आहेत.
शासनमान्य दराने देयकांची आकारणी केल्याबाबतची खात्री करण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यातील रुग्णालयासाठी लेखा अधिकाऱ्यांच्या पथकाची नियुक्ती केली आहे. कोविड उपचारासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या हॉस्पीटलकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी होत आहेत. त्या अनुषंगाने शासनमान्य दराने देयकांची आकारणी केल्याबाबतची खात्री करण्यासाठी लेखा अधिकाऱ्यांच्या पथकाची नियुक्ती केली आहे. लेखा तपासणी पथक देयकांच्या अनुषंगाने नर्सिंग, आयसोलेशन, आयसीयु चार्जेस, रूम रेंट, कन्सल्टेशन, विविध चाचण्या, ऑक्सीजन, औषधे आदिंच्या शुल्क आकारणीबाबत काटेकोरपणे तपासणी करीत आहे. तसेच, जादा बिल घेणाऱ्या रुग्णांवर कारवाईचा बडगाही उगारण्यात येत आहे. मात्र, रुग्णाने तक्रार केल्यानंतर ही प्रक्रिया पार पडते.
पुणे शहरातील २५ हॉस्पिटलला आम्ही असे बोर्ड लावतोय. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे ज्यांना ज्यांना हे बोर्ड तुमच्या भागातील हॉस्पिटलसमोर दिसतील त्यांचे फोटो काढा आणि ते तुमच्या भागातील whatsapp ग्रुप वर किंवा fb ला टाका जेणेकरून तुमच्यामुळे एका तरी रुग्णाचे बिल कमी झालेच पाहिजे. pic.twitter.com/qNps1bI9AF
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) August 25, 2020
पुण्यातील मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी पुणे शहरातील 25 मोठ्या रुग्णालयाबाहेर बॅनर झळकावले आहेत. या बॅनरवर संबंधित रुग्णालयाच्या लेखा परीक्षण अधिकाऱ्याचे नाव व संपर्क क्रमांक टाकण्यात आला आहे. ''पुणे शहरातील २५ हॉस्पिटलला आम्ही असे बोर्ड लावतोय. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे ज्यांना ज्यांना हे बोर्ड तुमच्या भागातील हॉस्पिटलसमोर दिसतील त्यांचे फोटो काढा आणि ते तुमच्या भागातील whatsapp ग्रुपवर किंवा fb ला टाका जेणेकरून तुमच्यामुळे एका तरी रुग्णाचे बिल कमी झालेच पाहिजे'', असे आवाहनही वसंत मोरे यांनी केले आहे.