मनसेचा यु टर्न, पुण्यात येणाऱ्या ब्रिजभूषण सिंह यांना विरोध करणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 10:47 AM2022-12-09T10:47:27+5:302022-12-09T10:49:25+5:30
मनसेने का घेतली माघार? काय आहे प्रकरण?...
पुणे/किरण शिंदे :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी प्रखर विरोध केला होता. त्यामुळे राज ठाकरे यांना अखेर आपला अयोध्या दौरा रद्द करावा लागला होता. मात्र आता तेच ब्रिजभूषण सिंह येत्या काही दिवसात पुणे शहरात येणार आहेत. महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या निमित्ताने ते पुण्यात येणार आहेत. यावेळी सर्वांचे लक्ष हे मनसेच्या भूमिकेकडे होते. मात्र आता मनसेच्या भूमिकेने सर्वांनाच कोड्यात टाकले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ब्रिजभूषण सिंह यांना कोणताही विरोध करणार नाही, अशी माहिती मनसेने ते वसंत मोरे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना वसंत मोरे म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही भूमिका राज ठाकरे यांनीच ठरवली आहे. ब्रिजभूषण सिंग यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र सैनिक किंवा पक्षाचा इतर कोणताही नेता यांची याविषयी कुठलीही प्रतिक्रिया येणार नाही. राज ठाकरेंचा आदेश यामुळे सर्व मनसैनिक शांत आहेत.
राज ठाकरेंचा आदेश-
प्रकृतीच्या कारणामुळे राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले नव्हते. यामध्ये इतर कुठलाही विषय नव्हता. राज ठाकरे जरी अयोध्येला गेले नव्हते तरी मनसैनिकांनी आयोजित जाऊन दर्शन घेतलं होते. त्यामुळे महाराष्ट्र सैनिकाची ताकद किती आहे हे संपूर्ण देशाला माहित आहे. अन्यथा आमच्याही अंगाला लाल माती लागली आहे. कुस्ती कशी खेळायची याविषयी देखील आम्हाला चांगलेच माहित आहे. मात्र राज ठाकरे यांचा आदेश असल्यामुळे ब्रिजभूषण सिंग यांना मनसे विरोध करणार नाही, असेही वसंत मोरे म्हणाले.
ब्रिजभूषण सिंग यांचे आम्ही स्वागत करू-
राजकारणात कुणीही शत्रू नसतो, त्याप्रमाणे कुस्तीचे नियम देखील तसेच आहेत. पराभव झाल्यानंतर सुद्धा कुस्तीतले पैलवान एकमेकांची गळाभेट घेत असतात. ही महाराष्ट्राची संस्कृती असल्यामुळे त्याप्रमाणेच ब्रिजभूषण सिंग यांचे आम्ही स्वागत करू असे देखील वसंत मोरे यांनी सांगितले..