खळबळजनक! तपासासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा प्राणघातक हल्ला; पुण्यात दीडशे जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 10:05 PM2021-06-23T22:05:44+5:302021-06-23T22:09:19+5:30
पुण्यातील वारजेतील म्हाडा कॉलनीतील घटना
वारजे : गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी तपासासाठी वारजेतील म्हाडा कॉलनी येथे तपासासाठी गेले असता त्यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी सुमारे दीडशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा (युनिट १ )वाहनचोरी विरोधी पथकात कार्यरत असलेले पोलीस शिपाई श्रीकांत दगडे व ऋषिकेश कोळप हे वारजे परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना येथील म्हाडा कॉलनी परिसरात खबऱ्या धीरज डोलारे (रा. धनकवडी पुणे) यांनी अभिजीत खंडागळे (रा.चौथा मजला, म्हाडा कॉलनी, आरएमडी कॉलेजजवळ) गावठी बनावटीचे पिस्तूल व काडतुसे असून त्याचा वापर करून तो एक दोन दिवसात आपल्या साथीदारांसह परिसरात जबरी चोरी करणार आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्याबद्दल आपल्या वरिष्ठांना कळवून हे दोघे पोलीस कर्मचारी म्हाडा कॉलनी परिसरात बिल्डिंग क्रमांक 2 येथे मंगळवारी संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास पोहोचले.
अभिजीत खंडागळे राहत असलेल्या चौथ्या मजल्यावर जिन्याद्वारे पोलीस कर्मचारी वर जात असताना खाली काही तरुण मुले त्यांच्याकडे संशयाने पाहत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलीस कर्मचारी हे साध्या वेशात असल्यामुळे त्यांना ते पोलीस आहेत असे वाटले नाही. तसेच पोलीस बातमीदार धीरज डोलारे हा पोलिसांना कायम चुकीची माहिती देऊन कॉलनीतील रहिवाशांना नाहक त्रास देतो असा समज करून काही लोकांनी त्यांच्याशी बाचाबाची सुरू केली. त्यांच्यात वाद वाढत जाऊन सर्वांनी धीरज डोलारे व इतर पोलिस कर्मचाऱ्यांवर बांबू, सिमेंट ब्लॉक, स्टँप इत्यादी द्वारे हल्ला करून मारहाण केली. त्यात डोक्यात ब्लॉक लागल्याने डोलारे गंभीर जखमी झाला.
यावेळी पोलिसांनी आम्ही पोलिस असून सरकारी कामात तुम्ही अडथळा आणू नका असे त्यांना वारंवार विनवणी करून देखील आरोपींनी त्यांच्यावर हल्ला चढवून मारहाण करून गंभीर जखमी केले. यानंतर जखमींना वारजेतील जवळच्या माई मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हल्ला करणाऱ्या सुमारे दीडशेपेक्षा जास्त आरोपींपैकी सत्तावीस आरोपींची ओळख पटली असून इतरांची ओळख पटवण्याचे काम चालू आहे. वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात कलम ३०७ व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) अमृत मराठे करत आहेत. या प्रकरणी अजून अटक झालेली नसली तरी लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी दिली. बुधवारी पहाटे व दिवसभर पोलीस उपायुक्तसह इतर वरीष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यास भेट देऊन आढावा घेतला.