अकरावी प्रवेशासाठी सुरू केले मोबाईल अॅप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:14 AM2021-08-29T04:14:57+5:302021-08-29T04:14:57+5:30
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना घरी बसून अॅंड्राॅईड मोबाईलमधून अकरावी प्रवेशाचा अर्ज भरता यावा, यासाठी मोबाईल अॅप सुरू केले ...
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना घरी बसून अॅंड्राॅईड मोबाईलमधून अकरावी प्रवेशाचा अर्ज भरता यावा, यासाठी मोबाईल अॅप सुरू केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु, अकरावी प्रवेशाची पहिली फेरी सुरू असताना मोबाईल अॅप उपलब्ध करून दिल्यामुळे शिक्षण विभागाला उशिरा जाग आली असल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयामधील अकरावी प्रवेशाची पहिली प्रवेश यादी प्रसिद्ध झाली असून प्रवेशाच्या दुस-या दिवशी तब्बल १६ हजार ८२५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे प्रवेशास विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना येत्या ३० ऑगस्टपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. पहिल्या यादीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे ४० टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
नामांकित महाविद्यालयांसह अनेक महाविद्यालयांचा कट ऑफ गेल्या वर्षापेक्षा घटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे कनिष्ठ महाविद्यालय मिळण्याची शक्यता आहे. उपलब्ध जागांपेक्षा नोंदणी करणा-या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे तब्बल ३० हजार ५५४ जागा रिक्त राहणार आहे.