मोबाईल फॉरेन्सिक लॅबद्वारे तपासणी
By Admin | Published: July 14, 2016 12:50 AM2016-07-14T00:50:43+5:302016-07-14T00:50:43+5:30
अपुऱ्या सुविधांमुळे गंभीर गुन्ह्यांमध्ये न्यायवैद्यक पुरावा (फॉरेन्सिक एव्हिडन्स) गोळा करणे; तसेच तो न्यायालयात सादर करणे अवघड जात असल्यामुळे त्याचा थेट परिणाम शिक्षेचे
पुणे : अपुऱ्या सुविधांमुळे गंभीर गुन्ह्यांमध्ये न्यायवैद्यक पुरावा (फॉरेन्सिक एव्हिडन्स) गोळा करणे; तसेच तो न्यायालयात सादर करणे अवघड जात असल्यामुळे त्याचा थेट परिणाम शिक्षेचे
प्रमाण घटण्यावर होत होता. त्यामुळे पोलीस दलाला अत्याधुनिक आणि जलद अशा फॉरेन्सिक टीमची आवश्यकता होती. शासनाने तब्बल ११ कोटी रुपयांची तरतूद करून ‘मोबाईल फॉरेन्सिक लॅब’ तयार केल्या आहेत.
अत्याधुनिक साधन-सुविधांसह सज्ज असलेल्या वाहनांचे उद्घाटन बुधवारी पोलीस महासंचालक (लीगल व टेक्निकल) प्रभात रंजन यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सीआयडीचे प्रमुख तथा अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल, रितेश कुमार, अधीक्षक प्रसाद अक्कानवरू, राजेंद्र न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या उपसंचालक डॉ. संगीता घुमटकर, के. व्ही. कुलकर्णी, पोलीस निरीक्षक पी. एल. अष्टपुत्रे उपस्थित होते.
गंभीर गुन्हे घडल्यानंतर घटनास्थळी ही वाहने जातील. त्यातील अत्याधुनिक साहित्याच्या मदतीने पुरावे गोळा करण्यात येतील. यामुळे तपासात मोलाची मदत मिळणार असून, ठोस फॉरेन्सिक पुरावे उपलब्ध झाल्यामुळे गुन्हेगारांना शिक्षा होण्यात मदत होणार असल्याची माहिती या वेळी प्रभात रंजन यांनी दिली.
(प्रतिनिधी)
शासनाने या प्रकल्पासाठी मोठी आर्थिक तरतूद केली असून, एकूण ४५ वाहने तयार करण्यात येत आहेत. यातील दहा वाहने तयार झालेली असून, ही वाहने पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक आणि सोलापूर आयुक्तालय; तसेच उस्मानाबाद, नांदेड, पुणे ग्रामीण आणि ठाणे ग्रामीण अधीक्षक कार्यालयामध्ये देण्यात येत आहेत. फॉरेन्सिकसाठी आवश्यक असलेली नार्कोटिक्स, बॉम्बशोधक यासोबतच सर्व गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठीची सर्व किट्स या वाहनांमध्ये बसविण्यात आली आहेत. या वाहनांमधून चार जण प्रवास करू शकतील; तसेच त्यांना गाडीमध्येच मुक्कामाचीही सुविधा देण्यात आली आहे. वाहनामध्ये एक अंगुलिमुद्रातज्ज्ञ, एक छायाचित्रकार आणि दोन न्यायवैद्यक तज्ज्ञ प्रवास करू शकतील, असे सीआयडी प्रमुख संजय कुमार यांनी सांगितले.