मोबाइल जॅमर चाललेच नाहीत! यूपीएससी पूर्वपरीक्षा केंद्रांवरील प्रकार, १२ हजार ३७२ उमेदवार अनुपस्थित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 05:53 AM2018-06-04T05:53:51+5:302018-06-04T05:53:51+5:30
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्वपरीक्षांसाठी शहरातील परीक्षा केंद्रांवर यंदा पहिल्यांदाच मोबाइल जॅमर लावण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात बहुतांश ठिकाणी या मोबाइल जॅमरने कामच केले नाही, अशी माहिती परीक्षा केंद्रांवरील शिक्षकांनी दिली.
पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्वपरीक्षांसाठी शहरातील परीक्षा केंद्रांवर यंदा पहिल्यांदाच मोबाइल जॅमर लावण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात बहुतांश ठिकाणी या मोबाइल जॅमरने कामच केले नाही, अशी माहिती परीक्षा केंद्रांवरील शिक्षकांनी दिली. त्याचवेळी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना पोहोचण्यास थोडाही उशीर झाला तर त्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यास आडकाठी करण्यात आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या.
यूपीएससी पूर्वपरीक्षेत मोबाइलचा वापर करून गैरप्रकार करण्याचे काही प्रकार उजेडात आल्याने यंदा परीक्षा केंद्रांवर मोबाइल जॅमर बसविण्यात आले होते. मात्र, अनेक ठिकाणी हे मोबाइल जॅमर कार्यान्वितच झाले नाहीत. यामुळे यंदा तरी हा प्रयोग यशस्वी होऊ शकलेला नाही. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी एकीकडे नियमावर बोट ठेऊन विद्यार्थ्यांना वेठीस धरायचे आणि दुसरीकडे मोबाइल जॅमरसारख्या उपाययोजना मात्र फेल ठरत असल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शहरातील ७४ परीक्षा केंद्रांवर यूपीएससीची पूर्वपरीक्षा पार पडली. पुणे शहरातून ३० हजार ४३० विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षेसाठी अर्ज भरला होता, मात्र १८ हजार ३०१ उमेदवारांनीच ही परीक्षा दिली. तब्बल १२ हजार १२९ उमेदवार परीक्षेला अनुपस्थित राहिले. परीक्षेला अनुपस्थित राहण्याचे प्रमाण यंदा खूपच मोठे राहिले आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळेपूर्वी दोन तास अगोदर उपस्थित राहण्याच्या सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना परीक्षेला येण्यास पाच-दहा मिनिटे उशीर झाला तरी त्यांना प्रवेश देण्यास नकार दिला जात होता. त्यामुळे त्यांना मोठया त्रासाला सामोरे जावे लागले. सकाळी ९.३० ते ११.३० आणि दुपारी (पान ५ वर)
२.३० ते ४.३० अशी परीक्षेची वेळ होती.
परीक्षेसाठी प्रत्येक परीक्षा केंद्रांवर ५ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रत्येक उमेदवारांची तपासणी करूनच त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. परीक्षा केंद्रात वेळेपूर्वी दोन तास अगोदर हजर राहण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठी धावपळ करावी लागली. त्याचबरोबर दोन पेपरच्या मध्येही खूप जास्तीचा गॅप ठेवण्यात आला होता. त्याचाही विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. एका विद्यार्थींनीला परीक्षा केंद्रात पोहचण्यास ५ मिनिटेच उशीर झाला होता, मात्र तिला प्रवेश दिला नाही अशी तक्रार तिने केली आहे.
पहिलाच प्रयोग
असल्याने अडचणी
परीक्षा केंद्रावर पहिल्यांदाच मोबाइल जॅमर बसविण्यात येत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी पहिल्या सत्रात ते सुरू करता आले नाहीत. दुसºया सत्रात मात्र बहुतांश ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न केला होता.
- प्रल्हाद हिरामणी,
परीक्षा समन्वयक व तहसीलदार