‘मोबाईल’मुळे वाढला बहिरेपणाचा धोका :  डॉ. कल्याणी मांडके 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 06:08 PM2020-03-05T18:08:35+5:302020-03-05T18:10:24+5:30

२०२२ पर्यंत ही स्मार्ट मोबाईल फोन वापरणाऱ्यांची संख्या ४४ कोटींच्या पुढे जाणार

'Mobile' increases the risk of deafness: Dr. Kalyani Mandke | ‘मोबाईल’मुळे वाढला बहिरेपणाचा धोका :  डॉ. कल्याणी मांडके 

‘मोबाईल’मुळे वाढला बहिरेपणाचा धोका :  डॉ. कल्याणी मांडके 

Next
ठळक मुद्देविज्ञान परिषद व रसायनशास्त्र विभागातर्फे व्याख्यान

पुणे : आजघडीला भारतात जवळपास ३८ कोटी भ्रमणध्वनी वापरात आहेत. त्यातील ४० टक्के स्मार्टफोन असून, २०२२ पर्यंत ही संख्या ४४ कोटींच्या पुढे जाईल. तरुणाई फोनचा वापर प्रामुख्याने संगीत व इतर करमणुकीचे कार्यक्रम ऐकण्यासाठी करते. स्मार्टफोनच्या अतिवापराने श्रवणदोष होण्याचा धोका अधिक असतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार ११० कोटी तरुण व्यक्तींना श्रवणक्षमता कमी होण्याचा धोका आहे, असे प्रतिपादन श्रवणतज्ज्ञ डॉ. कल्याणी मांडके यांनी व्यक्त केले.
जागतिक श्रवण दिनाचे औचित्य साधून मराठी विज्ञान परिषद व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा रसायनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आरोग्यासाठी आनंददायी आणि सुरक्षित श्रवण’ या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ. मांडके बोलत होत्या. रसायनशास्त्र विभागात झालेल्या या व्याख्याना वेळी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ, उपाध्यक्ष व व्याख्यानाच्या समन्वयक डॉ. नीलिमा राजूरकर, सदस्य डॉ. सुजाता बरगाले, रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. मोहन कुलकर्णी, डॉ. कुमारी दिम्या, तन्मय इलमे, गणेश शिंदे, पूजा ढोरगे आदी उपस्थित होते.
डॉ. मांडके म्हणाल्या, ‘‘जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार सुमारे ४६ कोटींपेक्षा जास्त व्यक्ती श्रवणदोषाने बाधित आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे याची व्याप्ती वाढतच असून, त्यावर नियंत्रणासाठी जनजागृती आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने ३ मार्च हा दिवस ‘जागतिक श्रवण दिन’ म्हणून घोषित केला असून, त्याची संकल्पना ‘जीवनासाठी श्रवण : श्रवणदोषाने तुमचे आरोग्यदायी जीवन मर्यादित करू नका,’ अशी आहे. आवाजाची तीव्रता आणि वापर श्रवणाची सुरक्षित पातळी ठरवतात. जास्त काळासाठी इअरबड वापरायचे झाल्यास आवाजाची तीव्रता कमी ठेवणे हितावह असते.’’
प्रा. मोहन कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तन्मय इलमे, गणेश शिंदे, पूजा ढोरगे, डॉ. कुमारी दिम्या यांनी जनजागृतीसाठी श्रवणसंबंधित विषयांवर भित्तिपत्रकाद्वारे सादरीकरण केले आणि उपस्थितांची श्रवण चाचणी घेतली.
०००
 

Web Title: 'Mobile' increases the risk of deafness: Dr. Kalyani Mandke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.