मोबाईलने मेंदू केला ‘आळशी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:11 AM2021-07-07T04:11:41+5:302021-07-07T04:11:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एक काळ असा होता की, कुणी एखादा क्रमांक सांगितला तर तो लगेच मेंदूत ‘फिक्स’ ...

Mobile makes brain 'lazy' | मोबाईलने मेंदू केला ‘आळशी’

मोबाईलने मेंदू केला ‘आळशी’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : एक काळ असा होता की, कुणी एखादा क्रमांक सांगितला तर तो लगेच मेंदूत ‘फिक्स’ व्हायचा किंवा वहीत नोंदवला जायचा; पण मोबाईल आल्यापासून लक्षात ठेवण्याची सवय कमी होऊ लागली आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे आबालवृद्धांचा मेंदू आळशी होतोय का? मोबाइलची इतकी सवय झाली आहे की कुणी क्रमांक सांगितला तर ‘थांबा, मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवतो. नंतर मला आठवणार नाही,’ असे म्हटले जाते. मोबाईलच्या आहारी गेल्याने मेंदूतली साठवणीची प्रक्रियाच मंदावली आहे. हा भविष्यासाठी धोक्याचा इशारा असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे सांगणे आहे.

पूर्वी कॅलक्युेलटर (गणकयंत्र) आले आणि पाढे पाठ करण्याचा विसर पडला. लाखोंचे व्यवहार तोंडी करणारी माणसं इतिहासजमा झाली. आता मोबाईलमुळे असेच काहीसे होणार असल्याची चिन्हे आहेत.

आजमितीला मोबाईल हा अनेकांच्या जीवनातला अविभाज्य घटक बनला आहे. अगदी सहज लक्षात ठेवण्याच्या गोष्टींसाठीही मोबाईलचा वापर केला जाऊ लागला आहे. शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. पाढे पाठ करणे, त्यावर आधारित गणिताची आकडेवारी करणे या गोष्टी मोबाईलने संपवल्या आहेत. एखाद्या गणिताची आकडेमोड करताना मुले मोबाईलचा आधार घेतात. जी मुले किंवा ज्येष्ठ व्यक्ती मोबाईलचा वापर अगदी मोजका करतात किंवा अजिबात करत नाहीत, त्यांची स्मरणशक्ती अधिक चांगली असल्याचे दिसून येते. जे मोबाइलचा वापर करीत नाहीत त्यांची आकलनक्षमताही अधिक चांगली असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

चौकट

जिवंत स्मृतींची साथ सुटतेय?

“मोबाईलमुळे यंत्रावरचे अवलंबित्व वाढले आहे. त्यामुळे सगळे सक्रिय जिवंत स्मृतीमध्ये साठवावे याचे भान राहिलेले नाही. यासाठी निर्जीव यंत्राचा आधार लोक घेऊ लागले आहेत. स्मृती जिवंत आहे, मोबाईल ‘मटेरिअल’ आहे. आपली स्वत:ची जिवंत स्मृती सोडून मनुष्य यंत्राने साठवलेल्या स्मृतीवर विसंबून राहू लागला आहे. हे धोक्याचे आणि तोट्याचे लक्षण आहे. यातून माणूस आपले अपरिमित नुकसान करून घेत आहे.”

- डॉ. उल्हास लुकतुके, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ

चौकट

“ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाईल मुलांच्या जीवनाचाही अविभाज्य घटक बनला आहे. याचे फायदे नव्हे तर तोटेच अधिक दिसत आहेत. मेंदू हा यंत्राप्रमाणेच विचार करू लागला आहे. त्यामुळे मुलांची विचारक्षमता खुंटत चालली आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर काय असू शकते किंवा गणिताची आकडेमोड हे देखील मुलांना मोबाईलशिवाय करता येण शक्य होत नाही. कुठलीही गोष्ट गुगलवर शोधायची सवय मुलांना झालीय याची खंत वाटते.”

- ॠता वाटवे, पालक

चौकट

“वयोमानापरत्वे स्मरणशक्ती हळूहळू कमी होत जाते; पण मोबाईलमुळे ती अधिक क्षीण होते. आपण नैसर्गिकपणे काही गोष्टी स्मृतीमध्ये साठवू शकतो. मग यंत्राची गरज काय? डायरीमध्ये क्रमांक लिहून ठेवण्याची सवय अजूनही जपली आहे. मोबाईल फारसा वापरत नाही. त्यामुळे स्मरणशक्ती आजही चांगली आहे. वयोमानामुळे क्रमांक तोंडपाठ नसले तरी पूर्वीच्या खूप गोष्टी आजही आठवतात.”

-केशव वाटवे, ज्येष्ठ नागरिक (वय ७० वर्षे)

चौकट

मोबाईलची फार सवय नाही

“शाळेचे शिक्षण ऑनलाइन असल्यामुळे तेवढ्यापुरताच मोबाईलचा वापर करतो. आई-बाबांनी ऑनलाइन क्लासव्यतिरिक्त मोबाइल वापरण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे मोबाइलची फारसी सवय नाही.”

- सिद्धांत देव, विद्यार्थी (वर्ग पाचवी)

Web Title: Mobile makes brain 'lazy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.