पुणे: झारखंडच्या दरोडेखोरांकडून दीड कोटीचे मोबाईल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 09:42 AM2022-07-28T09:42:19+5:302022-07-28T09:43:33+5:30
आरोपींना लोणीकंद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे....
पुणे : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या झारखंडमधील टोळीतील दोघांना लोणीकंद पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांचे तीन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत वाघोली येथील प्रो. कनेक्ट सप्लाय चेन सोल्युशन या कंपनीच्या गोडावूनमधून ॲपल कंपनीचे मोबाईल, लॅपटॉप व इतर साहित्य चोरीचा गुन्हा उघडकीस आला. चोरट्यांकडून १९७ मोबाईल, ३ लॅपटॉप, ७ आयपॅड व इतर साहित्य असा तब्बल १ कोटी ५३ लाख ९८ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
अब्दुल हाय अबुजार शेख (वय २०), अबेदुर मुफजुल शेख (३४) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. फरार साथीदार सुलताना अब्दुल शेख (३२), अबुबकर अबुजार शेख (२३), राबीवुल मुंटू शेख (२२, सर्व रा. जि. साहेबगंज, झारखंड) यांच्यावर लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी ही चोरी दि. २४ जुलै रोजी केली. चोरीचे सर्व साहित्य चाकण येथील एका भाड्याच्या खोलीत ठेवले होते.
अधिक माहितीनुसार, लोणीकंद पोलिसांचे पथक सोमवारी गस्तीवर होते. त्यांना रात्रीच्या वेळी लोणीकंद ते केसनंद रोडवरील खंडोबा माळाच्या चढावर पाच ते सहाजणांचे एक टोळके हिंदी भाषेत चर्चा करीत असून, ते ट्रक लुटण्याच्या किंवा पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, निखिल पवार, उपनिरीक्षक सूरज गोरे यांच्या पथकाने छापा टाकून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी अब्दुल आणि अबेदूर हे दोघेच त्यांच्या हाती लागले. इतर तिघे साथीदार फरार झाले होते.
दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, झारखंड राज्यातील असल्याचे सांगितले होते. त्यांच्याकडून सुरुवातीला मोबाईल, सीमकार्ड, दोन स्क्रू ड्रायव्हर, दोन लोखंडी पक्कड, कोयता, दोरी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. ही कामगिरी पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब सकाटे, विनायक साळवे, सागर जगताप, समीर पिलाने यांच्या पथकाने केली.