माऊलींच्या पालखी सोहळ्यात मोबाइल पोस्ट आॅफिस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 05:31 AM2018-07-08T05:31:21+5:302018-07-08T05:31:55+5:30
आपल्या घरा-गावापासून लांब आलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी भारतीय डाक विभागाच्या पुणे क्षेत्राने आळंदी ते पंढरपूर अशी मोबाइल पोस्ट आॅफिसची सेवा सुरू केली आहे.
- गोपालकृष्ण मांडवकर
पुणे - आपल्या घरा-गावापासून लांब आलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी भारतीय डाक विभागाच्या पुणे क्षेत्राने आळंदी ते पंढरपूर अशी मोबाइल पोस्ट आॅफिसची सेवा सुरू केली आहे. नातेवाइकांकडून आलेली पत्रे आणि मनिआॅर्डर थेट दिंडीतील वारकºयांपर्यंत पोहोचविण्याची सुविधा टपाल खात्याने केली आहे.
एका मॅटॅडोरवरच पार्सल व्हॅनप्रमाणे हे मोबाइल पोस्ट आॅफिस तयार करण्यात आले आहे. वारीसोबत पूर्ण काळ हे पोस्ट आॅफिस थेट पंढरपूरपर्यंत राहणार आहे. रजिस्टर, स्पीड पोस्ट, मनिआॅर्डर, पार्सल सेवेचा समावेश आहे. यासोबतच टपाल साहित्यांची विक्री आणि टपाल सेवेची माहितीदेखील या मोबाइल पोस्ट आॅफिसातून दिली जाणार आहे. आळंदी येथील पोस्टमास्तर एम. एम. उगले यांच्या नेतृत्वात चार कर्मचारी येथे राहणार आहेत.
वारक-यांचे पैसे हरवितात किंवा काही वस्तूंची गरज पडू शकते. अशावेळी गावाहून मनिआॅर्डर अथवा पार्सल मागविण्यासाठी आणि ते थेट वारक-यांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था उभारल्याचे पोस्टमास्तर उगले यांनी सांगितले. दिनांक ६ जुलैला दुपारी आळंदी येथे मोबाइल पोस्ट आॅफिसचे उद्घाटन झाले.