Pune: मोबाईल चोरीचे कनेक्शन नेपाळमार्गे थेट चीनपर्यंत; गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी

By नितीश गोवंडे | Published: June 24, 2024 03:32 PM2024-06-24T15:32:00+5:302024-06-24T15:32:55+5:30

स्वारगेट पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक (गुन्हे) गीता बागवडे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली आहे....

Mobile theft links directly to China via Nepal; Performance of Crime Branch Team | Pune: मोबाईल चोरीचे कनेक्शन नेपाळमार्गे थेट चीनपर्यंत; गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी

Pune: मोबाईल चोरीचे कनेक्शन नेपाळमार्गे थेट चीनपर्यंत; गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी

पुणे : महिन्याकाठी शहरातून शेकडो मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी ऑनलाईन दाखल होत असतात. मात्र, एकदा मोबाईल चोरीला गेला की तो परत मिळण्याची शक्यता नसल्यासारखीच असते. चोरीला गेलेले मोबाईल परत मिळत नसल्याने सर्वसामान्य नागरिक दरवेळी पोलिसांना दोष देत बसतात. मात्र, स्वारगेट पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोबाईल चोरीचे रॅकेट शोधून काढले असून, शहरातून चोरीला गेलेल्या मोबाईलचे कनेक्शन नेपाळमार्गे थेट चीनपर्यंत पोहोचलेले असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. स्वारगेट पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक (गुन्हे) गीता बागवडे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली आहे.

स्वारगेट पोलिसांनी ४७ मोबाईल आणि ३ लॅपटॉप जप्त करत दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये आणखीन आरोपी समोर येण्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तवली आहे. इम्रान ताज शेख (३०, रा. अशरफ नगर, कोंढवा) आणि ओसामा शफिक शेख (२२, रा. सय्यद नगर, हडपसर, मुळ रा. कुंभार पिंपळगाव, धनसावंगी, जि. जालना) अशी आरोपींची नावे आहेत. इम्रानवर यापूर्वी विविध पोलिस ठाण्यांमध्ये १० गुन्हे दाखल आहेत.

अशी होती मोडस ऑपरेंटी...

इम्रान हा मोबाईल चोर आहे तर ओसामाचे मोबाईल रिपेअरिंगचे दुकान आहे. चोरलेले मोबाईल इम्रान ओसामाला नेऊन देत होता. पुढे हे मोबाईल कुरिअरद्वारे ठाणे, मुंबईला पाठवले जायचे. अथवा तेथील एजंट शहरात येऊन मोबाईल घेऊन जात असे. या आरोपींनी काही  महिन्यांमध्ये ५०० मोबाईल कुरिअरने पाठवल्याची माहिती देखील पोलिस तपासात समोर आली आहे. आबिद पटेल नामक मुंबईतील व्यक्ती पुढे स्पेअर पार्ट पाठवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुंबईच्या एजंटच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना झाली असून, लवकरच संबंधित आरोपी देखील आमच्या ताब्यात येतील अशी माहिती पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली.

स्पेअर पार्ट काढून नेपाळमार्गे थेट चीन...

चोरलेले मोबाईल मुंबईला आल्यानंतर त्यांचे स्पेअर पार्ट काढले जातात. त्यामुळे ते ट्रेस होत नाहीत. त्यानंतर संबंधित स्पेअर पार्ट कलकत्ता, पश्चिम बंगाल मार्गे नेपाळ आणि तेथून थेट चायनाला पाठवले जात असल्याचे देखील पोलिस तपासात समोर आले आहे. चीन येथून पुन्हा हे स्पेअर पार्ट नवीन होऊन होलसेलमध्ये विक्रीसाठी बाजारात येत असल्याचे देखील यावेळी समोर आले आहे.

असा आला ओसमा या धंद्यात..

ओसामा शफीक शेख हा मूळ जालना जिल्ह्यातील घनसावंगीचा. तेथे रफीक मियाँ नामक पश्चिम बंगाल येथील व्यक्ती त्याला भेटला. त्याने ओसामा शेख याला या धंद्यात आणले. पुण्यात त्याला सेटअप करून दिला. ओसमामुळे अनेक मोबाईल चोर आणि दुकानदार समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घरफोड्या करण्यापेक्षा मद्यपी, रिकामे उद्योग करणाऱ्या मुलांकडून अशाप्रकारे चोऱ्या करायला लावून  त्यांच्याकडून किरकोळ पैशात चोरीचे मोबाईल घेऊन हा उद्योग अशाप्रकारे सुरू असल्याचे यामुळे समोर आले.

यांनी केली कामगिरी...

ही कामगिरी पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलिस आयुक्त नंदीनी वग्यानी-पराजे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप फुलपगारे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) गीता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक चांगदेव सजगणे, उपनिरीक्षक अशोक येवले, पोलिस  कर्मचारी हर्षल शिंदे, सुजय पवार, नितीन क्षिरसागर, संदीप गोडसे, प्रतिक, पवार आणि गोडसे यांच्या पथकाने केली.

Web Title: Mobile theft links directly to China via Nepal; Performance of Crime Branch Team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.