गणेशोत्सवातील गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी; आंतरराज्यीय टोळीकडून १५ लाखांचे मोबाईल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 07:01 PM2022-09-02T19:01:44+5:302022-09-02T19:01:56+5:30
मागील १० दिवसांपासून या परिसरात चोरी करत असल्याची कबुली चोरांनी दिली
धायरी : सध्या राज्यामध्ये गणेशोत्सव सण मोठया प्रमाणात साजरा होत असून या सणानिमित्त खरेदी व दर्शनाकरीता नागरिक मोठया प्रमाणात गर्दी करीत असतात. याच गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी व पाकिट चोरीचे गुन्हे मोठया प्रमाणात घडत असतात. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरी करून आलेल्या चोरट्यांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडुन त्यांच्याकडून १५ लाख २५ हजार रुपयांचे एकूण ८४ मोबाईल फोन जप्त केले आहेत. याप्रकरणी शरथ मंजुनाथ, (वय २१ वर्षे) केशवा लिंगराजु (वय २४ वर्षे) नवीन हनुमानथाप्पा ( वय १९ वर्षे) सर्व राहणार हौसमाने भद्रावती शिमोगा राज्य :कर्नाटक) तिघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकातील अधिकारी व अंमलदार गुन्हयांच्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार देवा चव्हाण, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर यांना त्यांच्या खास बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, मोबाईल चोरी करणारे तीन इसम फनटाईम थिएटरच्या मागील रस्त्यावर थांबलेले असून त्यांच्याकडे दोन काळ्या रंगाच्या बॅग आहेत. तसेच त्या बॅगमध्ये चोरी केलेले मोबाईल आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने ती वरिष्ठांना कळविली असता वरिष्ठांनी खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले. त्यांच्याकडील दोन बॅगा ताब्यात घेऊन तपासल्या असता त्यामध्ये एकूण ८४ मोबाईल फोन सापडले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, सहायक पोलिस आयुक्त सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे, सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम, आबा उत्तेकर, पो.हवालदार संजय शिंदे, पोलीस अंमलदार शंकर कुंभार, अमित बोडरे, देवा चव्हाण, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर, अविनाश कोंडे, अमोल पाटील, विकास पांडुळे, विकास बांदल, दिपक शेंडे, सचिन गाढवे, नलिन येरुणकर यांनी केली आहे.
गर्दीचा फायदा घेऊन चोरत असत महागडे मोबाईल...
कर्नाटक राज्यातून आलेली ही टोळी मुख्यतः मार्केटयार्ड भाजी मंडई, स्वारगेट बस स्टॅण्ड, बालाजीनगर, कात्रज भाजी मार्केट, अभिरुची परिसर, वडगाव भाजी मार्केट तसेच पुणे शहराच्या इतर गर्दीच्या ठिकाणी थांबत असत. त्यानंतर गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांच्या खिशातील मोबाईल फोन लंपास करत असत. मागील १० दिवसांपासून ह्या चोरांनी या परिसरात चोरी केली असल्याचे पोलिसांना सांगितले आहे.