पुणे शहरात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट; तब्बल १३ हजाराहूनही अधिक नागरिकांचे मोबाईल चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 03:19 PM2021-09-05T15:19:31+5:302021-09-05T15:19:38+5:30

बसस्थानक, सांस्कृतिक कार्यक्रम, भाजी मंडई, राजकीय पक्षांची आंदोलने, कार्यक्रम, विवाह समारंभ, गर्दीचे रस्ते अशा ठिकाणाहून लोकांचे मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

Mobile thieves in Pune city; Mobile phones of more than 13,000 citizens were stolen | पुणे शहरात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट; तब्बल १३ हजाराहूनही अधिक नागरिकांचे मोबाईल चोरीला

पुणे शहरात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट; तब्बल १३ हजाराहूनही अधिक नागरिकांचे मोबाईल चोरीला

googlenewsNext
ठळक मुद्देशहरात जबरदस्तीने मोबाईल हिसकावून नेल्याच्या ७३ घटनांची नोंद

पुणे : सणानिमित्त महिला अंगावर दागिने घालून जात असतील तर त्यांना मंगळसूत्र चोरट्यांच्या सुळसुळाटामुळे दागिने सांभाळा, असा इशारा दिला जात असे. आता मंगळसूत्र चोरट्यांबरोबरच मोबाईल चोरट्यांची दहशत वाढली आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जात असाल तर मोबाईल सांभाळा असे सांगण्याची वेळ आली आहे. शहरात सध्या गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट झालेला दिसून येतो़ बसस्थानक, सांस्कृतिक कार्यक्रम, भाजी मंडई, राजकीय पक्षांची आंदोलने, कार्यक्रम, विवाह समारंभ, गर्दीचे रस्ते अशा ठिकाणाहून लोकांचे मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. 

गणेशोत्सवामुळे आता शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी वाढत आहे. त्याचा गैरफायदा हे मोबाईल चोरटे घेण्याची शक्यता आहे. पूर्वी लोकांच्या नकळत पाकीट मारले जायचे. आता त्याची जागा मोबाईलने घेतली आहे. त्यामुळे खरेदीसाठी आपण गर्दीच्या ठिकाणी जात असाल तर अगोदर मोबाईल सांभाळा. भाजी तसेच इतर वस्तू खरेदी करीत असताना तुम्ही खाली वाकत असता, त्या वेळी चोरटे गर्दी करून तुमच्या खिशातील मोबाईल अलगद चोरून नेत असतात.  

गेल्या ७ महिन्यात पुणे शहरातून तब्बल १३ हजार ८०० हून अधिक नागरिकांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. पुणे पोलिसांच्या वेबसाईटवर ‘लॉस्ट अँड फाऊंड’ वर नागरिकांनी मोबाईल हरवल्याची नोंद केली आहे. त्यातील बहुतांश मोबाईल हे लोकांच्या नकळत चोरलेले असतात. मात्र, पोलीस असे गुन्हे दाखल करण्याऐवजी लोकांना 'लॉस्ट अँड फाऊंड'वर नोंद करायला सांगतात. लोकांनाही नवे सिमकार्ड घेण्यासाठी केवळ पोलीस तक्रारीची नोंद हवी असते. त्याचबरोबर तक्रार नोंदवून घेतली तरी पोलीस आपला मोबाइल शोधणार नाही, याचा नागरिकांना विश्वास असल्याने तेही वेबसाईटवर तक्रार करुन मोबाईल चोरी विसरुन जातात. अशा प्रकारे शहरात दररोज साधारण ६५ मोबाइल चोरीला जात असतात. मात्र, त्यांची पोलिसांकडून हरविल्याची नोंद केली जाते. 

मोबाईल सांभाळणे हेच आपल्यासाठी महत्त्वाचे ठरणार

मोबाईलचोरीकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने चोरट्यांचे फावत आहे. असे चोरलेले मोबाईल विकणार्‍यांची टोळी विविध शहरांत कार्यरत आहे. हे चोरटे एका शहरात चोरलेले मोबाईल दुसर्‍या शहरात किंवा दुसर्‍या राज्यात नेऊन विकतात. हे चोरीचे मोबाईल गरीब घरातील लोक अल्प किमतीला विकत घेत असतात. त्यामुळे चोरीचा मोबाईल वापरणारा माहिती असला तरी त्याला पकडून आणणे अनेकदा खर्चिक काम असते. त्याचा मोबाईल चोरटे गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे आपण आपला मोबाईल सांभाळणे हेच आपल्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. 

जबरदस्तीने मोबाईल हिसकावून नेल्याच्या घटनेतही वाढ 

लोक रस्त्यावरून मोबाईलवर बोलत जात असताना त्यांच्या हातातून मोबाईल जबरदस्तीने चोरून नेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत जबरदस्तीने मोबाईल हिसकावून नेल्याच्या ७३ घटनांची नोंद शहरातील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.  त्याच वेळी आतापर्यंत मंगळसूत्रचोरीचे ४३ गुन्हे जुलैअखेर नोंदविले गेले होते. 

Web Title: Mobile thieves in Pune city; Mobile phones of more than 13,000 citizens were stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.