मोबाईल चोरट्यांचा शहरात धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:15 AM2021-09-12T04:15:15+5:302021-09-12T04:15:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणेः सोनसाखळी चोरट्यांबरोबरच मोबाइल चोरट्यांनीदेखील आता शहरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या हातामधील मोबाइल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणेः सोनसाखळी चोरट्यांबरोबरच मोबाइल चोरट्यांनीदेखील आता शहरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या हातामधील मोबाइल हिसकविण्याच्या ३ घटना घडल्या असून, येरवडा, विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वाघोली येथील २३ वर्षाची महिला येरवडा येथील शास्त्रीनगर बसस्टॉपवर मोबाइलवर बोलत उभी होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या हातामधील मोबाइल हिसकविण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने फोन जोरात पकडून आरडाओरडा केला. त्यावेळी दुचाकी थांबवून पाठीमागे बसलेल्या चोरट्याने चाकूचा धाक दाखवून मोबाइल छोड दो असा दम दिला. त्यामुळे महिलेने घाबरून मोबाइल सोडला. त्यानंतर चोरटे दुचाकीवरून मोबाइल घेऊन पसार झाले. ही घटना ४ सप्टेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत विमाननगर येथील गेरा कॉलेज सोसायटी समोरून ५ सप्टेंबर रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास शुभम जाधव (वय २२, रा. विमाननगर) हे घरी जात होते. त्यावेळी अचानक दोन दुचाकीवरून चार जण आले. त्यापैकी एका दुचाकीवरील आरोपीने त्यांच्या हातामधील १० हजार रूपयांचा मोबाइल हिसका मारून चोरून नेला. त्यानंतर चोरटे पसार झाले. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याचवेळी विमाननगर येथील दत्त मंदिर चौकात ३२ वर्षाच्या महिलेच्या हातामधील दोन दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी २० हजार रूपयांचा मोबाइल हिसकावून नेला. फिर्यादी त्यांच्या मैत्रिणीशी बोलत होत्या. त्यावेळी चोरट्यांनी अचानक जवळ येऊन मोबाइल हिसकविला. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही घटना एकाच आरोपीने केल्याची शक्यता आहे. सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा माग काढला जात आहे, अशी माहिती विमानतळ पोलिसांनी दिली.