मोबाईल कंपन्यांच्या थकबाकीचा ‘टॉवर’

By Admin | Published: May 29, 2015 12:59 AM2015-05-29T00:59:00+5:302015-05-29T00:59:00+5:30

सामान्यांच्या घरासमोर बँड वाजवून मिळकतकराची वसुली करणाऱ्या महापालिकेने कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या मोबाईल कंपन्यांकडे असलेल्या थकबाकीकडे मात्र दुर्लक्ष केले आहे.

Mobile tower companies 'tower' | मोबाईल कंपन्यांच्या थकबाकीचा ‘टॉवर’

मोबाईल कंपन्यांच्या थकबाकीचा ‘टॉवर’

googlenewsNext

राजानंद मोरे ल्ल पुणे
सामान्यांच्या घरासमोर बँड वाजवून मिळकतकराची वसुली करणाऱ्या महापालिकेने कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या मोबाईल कंपन्यांकडे असलेल्या थकबाकीकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. गेल्या वर्षीची मोबाईल टॉवर कंपन्यांच्या मिळकतकरापासून मिळणारे तब्बल ५६ कोटी रुपये थकीत आहे.
महापालिकेच्या कार्यक्षेत्रात मोबाईल कंपन्यांचे २२०० पेक्षा जास्त टॉवर आहेत. यातील ८० ते ९० टक्के टॉवर अनधिकृत आहेत. ज्या इमारतीवर टॉवर उभा करण्यात आला आहे, त्या इमारतीचा मिळकतकर संबंधित कंपन्यांना भरावा लागतो. त्यांची नोंदणीच नसल्याने त्यांच्याकडून मिळकतकराची वसुली होत नाही. मात्र, ज्या मोबाईल टॉवरची नोंदणी पालिकेकडे आहे, त्यांच्याकडूनही मुदतीत मिळकतकर भरला जात नाही. त्यामुळे ही थकबाकी वाढत आहे. पालिकेला २०१४-१५ या आर्थिक वर्षात मोबाईल टॉवरचा मिळकतकर सुमारे ३४ कोटी रुपये मिळाला. सुमारे ५६ कोटी रुपयांची थकबाकी या कंपन्यांकडे आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते तानाजी घोलप व विलास धनवे यांना करआकारणी व करसंकलन विभागाकडून ही माहिती मिळाली.

मोबाईल कंपन्या टॉवरच्या माध्यमातून मोबाईलधारकांना सेवा पुरवत असतात. त्यातून त्यांना कोट्यवधी रुपयांचा फायदा होता. तरीही या कंपन्यांकडून मिळकतकराची रक्कम वेळेवर भरली जात नाही. पालिकेला आधीच विकासकामांसाठी पुरेसा पैसा मिळत नाही. असे असतानाही प्रशासनाकडून मोबाईल कंपन्यांवर मेहरबानी केली जात आहे. प्रशासनाकडून कारवाई केली जात नसल्याने कंपन्या कर भरण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे दरवर्षी मिळकरकराची थकबाकी वाढतच जाते. कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करीत असल्याने त्यांना कर भरणे सहज शक्य आहे.

पालिकेकडून सामान्यांच्या घरासमोर बँड वाजवून थकबाकीची वसुली केली जाते. मात्र, कंपन्यांच्या कार्यालयासमोर बँड वाजवायला प्रशासन काणाडोळा करते. या कंपन्यांकडून वेळेवर कर न मिळाल्यास कारवाई करावी.
- तानाजी घोलप, माहिती अधिकार कार्यकर्ता

मोबाईल टॉवरचा जमा झालेला मिळकतकर (२०१४-१५)
३४ कोटी ४५ लाख ७० हजार ९१२
मोबाईल टॉवरची मिळकतकराची थकबाकी (२०१४-१५)
५५ कोटी ९३ लाख ४२ हजार ३९२

Web Title: Mobile tower companies 'tower'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.