फिरते महिला रिक्षाचालक सुविधा केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:09 AM2021-05-31T04:09:58+5:302021-05-31T04:09:58+5:30
पुणे : स्त्रीमुक्तीचे प्रणेते महात्मा जोतीराव फुले यांचे वैचारिक वारसदार, देवदासी प्रथा निर्मूलनाच्या लढ्यातील बिनीचे शिलेदार, कष्टकऱ्यांचे ज्येष्ठ नेते ...
पुणे : स्त्रीमुक्तीचे प्रणेते महात्मा जोतीराव फुले यांचे वैचारिक वारसदार, देवदासी प्रथा निर्मूलनाच्या लढ्यातील बिनीचे शिलेदार, कष्टकऱ्यांचे ज्येष्ठ नेते आणि रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव हे १ जूनला ९२ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या ९१ व्या वाढदिवसाची कृतिशील भेट रविवारी त्यांना रिक्षा पंचायतीने दिली.
रिक्षा परवानाधारकांना देण्यात येणाऱ्या १५०० रुपयांच्या अनुदानासाठी महिला व वृद्ध परवानाधारकांसाठी, महिला संचलित फिरते मोफत सुविधा केंद्र रविवारी सुरू करण्यात आले. रिक्षा पंचायत कार्यालय येथे दिवंगत रिक्षाचालकाच्या पत्नी सुनीता चांदेकर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार, रिक्षा पतसंस्था संचालक सिद्धार्थ चव्हाण, तुषार पवार, जतन फाउंडेशनचे संचालक रवींद्र झेंडे, महिला रिक्षा परवानाधारक अनिता पाटील, बेबीताई जांभळे, सुविधा केंद्र रिक्षाचालक वैशाली रासकर, केंद्र संचालक शकुंतला भालेराव, रिक्षा पंचायतीचे संगणक अभियंता विशाल बागूल, जितेंद्र फापाळे इ. उपस्थित होते. या वेळी उपस्थित रिक्षा परवानाधारकांचे अर्ज तत्काळ भरून त्याच्या शासनाकडून आलेल्या पोहोचपावत्या पवार यांच्या हस्ते महिला परवानाधारकांना देण्यात आल्या.