अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:17 AM2021-08-18T04:17:00+5:302021-08-18T04:17:00+5:30
भोर / वेल्हा : अंगणवाड्यांमध्ये असलेल्या मुलांची माहिती, स्तनदा, गर्भवती मातांची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यात आले. ...
भोर / वेल्हा : अंगणवाड्यांमध्ये असलेल्या मुलांची माहिती, स्तनदा, गर्भवती मातांची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यात आले. मात्र, हे मोबाईल सतत हँग होत आहेत. यामुळे यात माहिती अद्ययावत करताना अडचणी येत असल्याने अखेर त्रस्त झालेल्या भोर आणि वेल्हे तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी हे मोबाईलच शासनाला परत दिले आहे. आधुनिक आणि तुलनेने वेगवान असलेल्या मोबाईलची मागणी या अंगणवाडी सेविकांनी केली आहे.
भोर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांचे निकृष्ट दर्जाचे मोबाईल एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी भोर यांचेकडे परत दिले. अंगणवाडी समितीच्या वतीने प्रकल्प अधिकारी कुलदीप बोंगे महत्त्वाच्या कामासाठी मुंबई येथे गेले होते. त्यामुळे सुपरवायझर यांचेकडे बीटप्रमाणे यादी करून मोबाईल परत करण्यात आले. या वेळी घेण्यात आलेल्या सभेत मुंबई उच्च न्यायालयाने अंगणवाडी कृती समितीच्या वतीने पोषण टेकर इंग्रजीत भरण्याची सक्ती अंगणवाडी सेविकांना करता येणार नाही, त्यामुळे त्यांचा मानधन कापता येणार नाही अशा प्रकारचा निर्णय दिल्याचे विठ्ठल करंजे यांनी सांगितले. याचे टाळ्या वाजवून सेविकांनी स्वागत केले. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या यासाठी पुणे लेबर कोर्टात जिल्ह्याच्या अंगणवाडी सेविकांची केस दाखल केली असून, त्याची दुसरी तारीख २५ ऑगस्ट रोजी पडली असल्याचे विठ्ठल करंजे यांनी सांगितले.
वेल्हे तालुक्यातही महिला व बालकल्याण विकास अधिकारी साधू चांदणे यांच्याकडे सेविकांनी त्यांचे मोबाईल परत दिले आहेत. शासनाकडून अंगणवाडी सेविकांना चांगल्या दर्जाचे नवीन मोबाईल मिळावेत, अशी मागणी देखील या वेळी करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वेल्हे तालुकाध्यक्ष रेणुका कानडे यांनी दिली. पोषण अभियान कार्यक्रमांर्गत सन २०१९ मध्ये राज्यातील १ लाख ५ हजार ५९२ अंगणवाडी सेविकांना शासकीय कामासाठी मोबाईल वाटप करण्यात आले होते. या मोबाईलची वॅारंटी कालावधी २ वर्षांचा होता. हा कालावधी मे २०२१ रोजी संपला. तर मोबाईलच्या माध्यमातून लाभार्थ्यांची नावे, हजेरी, वजन, उंची, स्तनदा व गर्भवती मातांची माहिती, पोषण आहाराचे वाटप, अशी सविस्तर माहिती मोबाईलमधून भरण्यात येते. परंतु या मोबाईलची क्षमता (रॅम) केवळ २ जीबी असल्याने माहिती भरताना मोबाईल हॅंग होत आहे. मोबाईल गरम होत आहेत. त्यामुळे मोबाईल फुटण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. या आंदोलनावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वेल्हे तालुकाध्यक्ष रेणुका कानडे, सचिव सुरेखा जाधव, खजिनदार रंजना लिम्हण, सुपरवायझर योगिता भामरे, सुशीला वालगुडे, बेबी शेख, अलका पारठे आदींसह अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
कोट
जिल्ह्यातील काही तालुक्यांतील अंगणवाडी सेविकांनी त्यांचे मोबाईल परत केले आहे. या संदर्भात शासनाकडून आमच्यापर्यंत काही सूचना आल्या नाहीत. त्यामुळे मोबाईल बदलण्यासंदर्भात योग्य सूचना आल्यास त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल.
- दत्तात्रय मुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग
चौकट
केंद्र शासनाकडून पोषण आहार ट्रॅकर हे अॅप दिले असून हे अॅप पूर्णपणे इंग्रजी भाषेतून आहे. येथील अंगणवाडी सेविकांना ही माहिती भरण्यासाठी इंग्रजी येणाऱ्या दुसऱ्या व्यक्तींवर अवलंबून राहावे लागत आहे. अंगणवाडी सेविकांनी अॅंपमधून माहिती भरण्यासाठी अधिकारी वर्गाकडून जबरदस्ती केली जात आहे. सध्याचे मोबाईल निकृष्ट व सदोष असल्यामुळे अंगणवाडी सेविकांना चांगल्या प्रतीचे मोबाईल द्या, मराठी भाषेमधून निर्दोष पोषण आहार ट्रॅकर अॅंप द्या, अशी मागणी केली आहे.
फोटो : पंचायत समिती वेल्हे (ता. वेल्हे) नवीन चांगल्या दर्जाचे मोबाईल द्या मागणीचे निवेदन देताना अंगणवाडीसेविका.