८ महिन्यांत २९ कारवायांत १७९ गुन्हेगारांवर मोक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:12 AM2021-05-06T04:12:20+5:302021-05-06T04:12:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जागा खाली कर अन्यथा आम्हाला २ लाख रुपये खंडणी मागणार्‍यांना नकार दिल्याने तलवार डोक्यात ...

Mocca on 179 criminals in 29 operations in 8 months | ८ महिन्यांत २९ कारवायांत १७९ गुन्हेगारांवर मोक्का

८ महिन्यांत २९ कारवायांत १७९ गुन्हेगारांवर मोक्का

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जागा खाली कर अन्यथा आम्हाला २ लाख रुपये खंडणी मागणार्‍यांना नकार दिल्याने तलवार डोक्यात घालून खुनाचा प्रयत्न करणार्‍या हडपसर येथील ओंकारसिंग टाक टोळीवर संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ८ महिन्यांत केलेली ही २९ वी कारवाई असून त्यात आतापर्यंत १७९ गुन्हेगारांवर मोक्का कारवाई केली आहे.

टोळीप्रमुख ओंकारसिंग करतारसिंग टाक (वय २६), सोरनसिंग करतारसिंग टाक (वय २१), अवतारसिंग करतारसिंग टाक (वय २८), जपानसिंग करतारसिंग टाक (वय ३१), तुफानसिंग करतारसिंग टाक (वय ३०, सर्व रा. गाडीतळ, हडपसर) यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे.

ओंकारसिंग टाक याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने बेकायदेशीर टोळी तयार करून खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत करून दहशत निर्माण करणे, जबरी चोरी, दरोडा टाकणे, खंडणी वसूल करणे अशा प्रकारची कृत्ये केली आहेत. त्यामुळे हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्काचा प्रस्ताव तयार केला. अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी या प्रस्तावाची छाननी करून त्याला मंजुरी दिली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे करत आहेत.

अमिताभ गुप्ता यांनी गेल्या वर्षी २० सप्टेंबर २०२० रोजी पुणे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवून लोकांमध्ये दहशत निर्माण करणार्‍या सराईत गुन्हेगारांविरुद्ध त्यांनी मोहीम उघडली. त्यात सराईत गुन्हेगारांवर तडीपारी, मोका, एमपीडीएचा प्रभावी वापर केला. अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्काअंतर्गत केलेली ही २९ वी कारवाई आहे. या वर्षातील ही २४ वी कारवाई असून त्यात आतापर्यंत १७९ गुन्हेगारांवर मोक्का कारवाई केली आहे.

Web Title: Mocca on 179 criminals in 29 operations in 8 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.