कोंढवा परिसरात दहशत माजविणार्या मुनाफ पठाण टोळीच्या १० जणांवर मोक्का कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:20 PM2021-03-17T16:20:03+5:302021-03-17T16:22:43+5:30
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या वर्षात आतापर्यंत १४ टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.
पुणे : कोंढवा परिसरात दहशत माजविणार्या मुनाफ पठाणसह टोळीतील १० जणांवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या वर्षात आतापर्यंत १४ टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.
मुनाफ रियाज पठाण (वय २३, रा. नाना पेठ), कृष्णाराज सूर्यकांत आंदेकर (वय ३१, रा. नाना पेठ), विराज जगदीश यादव (वय २५, रा. हांडेवाडी रोड, आनंदनगर, हडपसर), आवेज आशपाक सय्यद (वय २०, रा. गणेश पेठ), अनिकेत ज्ञानेश्वर काळे (वय २५, रा. नाना पेठ), अक्षय नागनाथ कांबळे (वय २३, रा. ससाणेनगर, हडपसर), शहावेज ऊर्फ शेरु अब्दुल रशिद शेख (वय ३४, रा. गुरुवार पेठ), अमन युसुफ खाने (वय २०, रा. नाना पेठ), ओमकार शिवप्रसाद साळुंखे (वय २१, रा. नाना पेठ), यश सुनिल ससाणे (वय २०, रा. सय्यदनगर, हडपसर) अशी मोक्का कारवाई झालेल्यांची नावे आहेत.
फिर्यादी व त्यांचे मित्र हे मोटारसायकलवरुन जात असताना कोंढवा कात्रज रोडवरील आर एम डी शाळेसमोर ते आले होते. त्यावेळी पाठीमागून स्पोर्टस बाईकवरुन आलेल्यांनी पिस्तुलातून गोळीबार करुन फिर्यादीला जखमी केले होते. याप्रकरणी पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी मुनाफ पठाणसह १० जणांना पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी व त्याच्या साथीदारांनी मोटारसायकलवरुन नाना पेठेतून हातात कोयते नाचवत आरडा ओरडा करुन एक पोस्टर फाडले होते. आमच्या हद्दीत येऊन राडा केल्यावरुन कृष्णाराज आंदेकर व इतरांनी हा गोळीबार केला होता. या टोळीविरुद्ध कोंढवा तसेच फरासखाना, समर्थ, हडपसर पोलीस ठाण्यात शरीराविरुद्धचे ९ गुन्हे दाखल असून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केल्यानंतरही त्यांनी गुन्हे केले आहेत. शहरात त्यांची दहशत असून ते लोकांना दमदाटी करणे, लुटमार करणे असे प्रकार करीत असतात.
पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयार केला. अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कडक कारवाईवर भर दिला असून त्यांनी आतापर्यंत २० मोक्का कारवाया केल्या असून चालू वर्षातील ही १४ वी टोळ्यांविरुद्धची कारवाई आहे.