दहा जणांच्या टोळीवर मोक्काची कारवाई; टोळीप्रमुख टिप्या अद्यापही फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:12 AM2021-05-08T04:12:00+5:302021-05-08T04:12:00+5:30
पुणे : तडीपार असतानाही एका अल्पवयीन मुलाच्या खुनाचा प्रयत्न करण्याबरोबरच टोळीचे वर्चस्व व आर्थिक फायद्यासाठी दहशत पसरवून पोलीस ...
पुणे : तडीपार असतानाही एका अल्पवयीन मुलाच्या खुनाचा प्रयत्न करण्याबरोबरच टोळीचे वर्चस्व व आर्थिक फायद्यासाठी दहशत पसरवून पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे करणाऱ्या गुंड सुलतान ऊर्फ टिप्या लतीफ शेख याच्यासह टोळीतील नऊ साथीदारांवर संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.
विनोद ऊर्फ विन्या सुनील वाघमारे, साहील ऊर्फ सोन्या राजू वाघमारे, श्याम किशोर काळे, शुभम अनिल धिवार, रामनाथ ऊर्फ पापा मेनीनाथ सोनवणे, सागर ऊर्फ सॉगी किशोर गायकवाड, अनिकेत किशोर खंदारे, सौरभ तिमाप्पा धनगर आणि अतुल श्रीपास म्हस्कर ऊर्फ सोनू परमार यांना अटक केली आहे. मात्र, टोळीप्रमुख टिप्या अद्यापही फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिप्या हा तडीपार असतानाही बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येऊन साथीदारांच्या मदतीने त्याने चौदा वर्षांच्या अल्पवीयन मुलाच्या खुनाचा प्रयत्न केला. त्याच्या टोळीवर खुन, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घातक शस्त्र बाळगणे, दरोड्याचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्काचा प्रस्ताव सादर करून अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्यासमोर मंजुरीसाठी सादर केला होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या मोक्काच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली ही ३० वी कारवाई आहे, तर या वर्षातील अवघ्या चार महिन्यांत केलेली ही २५ वी कारवाई आहे. गुन्ह्याचा तपास लष्कर विभाग सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत सांगळे करीत आहेत.