पुण्यातील बिबवेवाडीत दहशत निर्माण करणाऱ्या हळंदे टोळीवर मोक्का कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 06:35 PM2021-06-08T18:35:13+5:302021-06-08T18:35:21+5:30
दर्शन हळंदे याने आपल्या इतर ५ साथीदारांच्या सोबत संघटित टोळी तयार केली होती
पुणे: बिबवेवाडी परिसरात दहशत निर्माण करणार्या दर्शन हंळदे टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशाने मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दर्शन युवराज हळंदे (वय २१, रा. राजीव गांधीनगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) आणि रोहन ऊर्फ मोन्या बाळु सातपुते (वय १८, रा. शिवशंभो नगर, कात्रज) अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून त्यांच्यचा इतर साथीदारांचा शोध घेण्यात येत आहेत.
दर्शन हळंदे याने आपल्या इतर ५ साथीदारांच्या सोबत संघटित टोळी तयार केली. १५ मे रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्याने मॉन्टी कालेकर याच्यावर तलवार उगारली. इतर ३ ते ४ जणांनी हातामध्ये बाटल्या व दगड घेऊन मॉन्टी कालेकर याला मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. एकाने आकाश खोपडे याच्या दिशेने बाटली फेकून मारली. ती आकाश याच्या डोक्याला लागून तो जखमी झाला होता. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
टोळीवर दंगा, मारामारी, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे
दर्शन हळंदे याने संघटित टोळी तयार केली असून त्यांनी हमरस्त्यावर गंभीर दुखापत, खुनाचा प्रयत्न, दंगा, मारामारी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करुन लोकांमध्ये दहशत पसरवित आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे यांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार प्रस्ताव तयार करुन पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे पाठविला होता. चव्हाण यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन त्याला मान्यता दिली आहे. सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे हे अधिक तपास करीत आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या कार्यकाळात मोक्का अंतर्गत केलेली ही ३२ वी कारवाई असून या वर्षातील ही २७ वी कारवाई आहे.