जुन्या भांडणावरुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरज अडागळे टोळीवर मोक्का कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 06:39 PM2021-02-06T18:39:00+5:302021-02-06T18:39:29+5:30
सहकारनगर पोलिसांनी ९ जणांवर होता गुन्हा दाखल..
पुणे : जुन्या भांडणावरुन मयुर आरडे याच्यावर कोयत्याने वार करत जीवे मारण्याच्या हेतूने मारहाण करुन दोन्ही हातांचे करंगळीजवळील बोटे तोडण्याच्या गुन्ह्यात सहकारनगर पोलिसांनी ९ जणांवर गुन्हा दाखल केला होता.सुरज अडागळे व त्याच्या टोळीने हा हल्ला केला होता. अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी सुरज अडागळे व त्याच्या ६ साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. सुरज अडागळे, आनंद ऊर्फ सोनु सिद्धेश्वर धडे(फरार), एजाज ऊर्फ रॅगी इसाक शेख, मोन्या ऊर्फ अपूर्व संजय खंडागळे, मंदार खंडागळे, नागेश ढावरे, केंदार खंडागळे अशी आरोपींची नावे आहेत.
मनोज ढावरे व मयुर आरडे यांच्या भांडणे झाली होती. या कारणावरुन ६ डिसेंबर २०२० रोजी पहाटे ५ वाजता तळजाई वसाहतीतील घरासमोर आरडे याच्यावर आरोपींनी कोयत्याने वार करुन जखर जखमी केले होते. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. याच्या तपासात सुरज अडागळे याने संघटीत टोळी तयार करुन हा खुनी हल्ला केल्याचे निष्पन्न झाले. संघटीत टोळीच्या माध्यमातून अडागळे याने टोळीची दहशत कायम ठेवण्याच्या उद्देशाने खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, गंभीर दुखापत, तडीपारीचा भंग करणे, विनयभंग, बाल लैगिक अत्याचार, शस्त्रजवळ बाळगणे असे गुन्हे सातत्याने केले आहेत.
सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे यांनी उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे मोक्का कारवाईचा प्रस्ताव पाठविला. डॉ. शिंदे यांनी या प्रस्तावाला मंजूर दिली असून सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन गंभीर गुन्ह्यांच्या ठिकाणी स्वत: भेट देऊन कठोर व कडक कारवाई करण्याबाबत वैयक्तिक मार्गदर्शन केले. गुन्ह्याचा सखोल तपास करुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याचे आदेश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोका अंतर्गत केलेली ही ५ वी कारवाई आहे. नव्या वर्षातील ही दुसरी कारवाई आहे.