रवींद्र बऱ्हाटे विरोधात आणखी एका प्रकरणात मोक्का कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:10 AM2021-03-07T04:10:33+5:302021-03-07T04:10:33+5:30

पुणे : हडपसर येथील खंडणी प्रकरणात मोक्का कारवाई झाल्यानंतर आता फरार रवींद्र बऱ्हाटे व त्याच्या ८ साथीदारांविरोधात चतु:शृंगी पोलीस ...

Mocca action in another case against Ravindra Barhate | रवींद्र बऱ्हाटे विरोधात आणखी एका प्रकरणात मोक्का कारवाई

रवींद्र बऱ्हाटे विरोधात आणखी एका प्रकरणात मोक्का कारवाई

Next

पुणे : हडपसर येथील खंडणी प्रकरणात मोक्का कारवाई झाल्यानंतर आता फरार रवींद्र बऱ्हाटे व त्याच्या ८ साथीदारांविरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात आणखी एक मोक्का कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, न्यायालयाने फरार घोषित केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने बऱ्हाटे याच्या ५ मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे.

रवींद्र लक्ष्मण बऱ्हाटे, शैलेश जगताप (रा. सोमवार पेठ पोलीस लाईन), परवेज जमादार (रा. सोमवार पेठ पोलीस लाईन), देवेंद्र जैन (रा. सिंहगड रोड), प्रकाश फाले (रा. कोथरूड), प्रशांत जोशी (रा. कोथरूड), विशाल तोत्रे (रा. पोलीस वसाहत, शिवाजीनगर), संजय भोकरे (रा. सिद्धीविनायक रेसिडेन्सी, कोथरूड) व इतर आरोपी यांच्याविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांनी दिले आहेत.

पाषाण येथील ६८ वर्षांच्या महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सहकारनगरमधील ४ एकर ९ आर मिळकतीचा व्यवहार करून परस्पर हृषीकेश बारटक्के याच्याकडून ७० लाख रुपये घेऊन फसवणूक व विश्वासघात केला. ही मिळकत बळकावण्याचे उद्देशाने महसूल दप्तरी हरकती घेऊन जमिनीच्या व्यवहारात तडजोडीसाठी ३ कोटी रुपयांची मागणी करून वेळोवेळी धमकी दिल्या. फिर्यादी यांनी या मिळकतीचा व्यवहार हृषीकेश बारटक्के याच्याबरोबर केल्याने त्याची बदनामी केली. तसेच खोटे गुन्हे दाखल करून आयुष्यभर तुरुंगामध्ये सडवण्याची धमकी दिली होती. यावरुन चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

टोळीप्रमुख रवींद्र बऱ्हाटे याने इतर टोळी सदस्यांना बरोबर घेऊन असे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव सहायक पोलीस आयुक्त रमेश गलांडे यांनी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे पाठविला होता. चव्हाण यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष ठेवून कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही ११ वी कारवाई असून या वर्षातील ही ७ वी कारवाई आहे.

Web Title: Mocca action in another case against Ravindra Barhate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.