गुंड रोशन लोखंडे व साथीदारांना पोलिसांचा दणका; मोक्का अंतर्गत केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 06:55 PM2021-03-26T18:55:33+5:302021-03-26T18:56:41+5:30
नऱ्हेगावात कोयता, पिस्तूल नाचवत केली होती दहशत...
धायरी: संघटित टोळी तयार करून त्यांच्यामार्फत गुन्हेगारी कृत्य करून दहशत निर्माण करणाऱ्या गुंड रोशन लोखंडे व त्याच्या टोळीतील चार जणांवर पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे.
रोशन दयानंद लोखंडे (वय: २१, रा. नवदीप सोसायटी, मानाजी नगर, नऱ्हे, पुणे) प्रसाद अर्जुन धावडे (वय:२०, रा. विठ्ठल रुक्मिणी हाईट्स, जाधव नगर, नांदेडगाव, पुणे) वैभव अरुण तिडके (वय:२१, रा. कृष्ण सदन बिल्डींग, मानाजीनगर, नऱ्हे, पुणे) पवन सुग्रीव बिराजदार वय:२४, रा. दत्तकला अपार्टमेंट,नऱ्हे, पुणे) फैजल फिरोज काझी (वय:२१, ऋतुंबरा हाईट्स, राम मंदिराजवळ पिराजी नगर, नऱ्हे, पुणे) अशी पाच आरोपींची नावे आहेत.
सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील पिराजी नगर परिसरात शिवजयंती दिवशी तडीपार गुंड रोशन लोखंडे व त्याच्या साथीदारांनी हातात कोयता व पिस्तूल घेऊन नाचत दहशत निर्माण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबाबत सिंहगड रस्ता पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेत आरोपींना तात्काळ अटक केली. नागरिकांत दहशत माजविल्याप्रकरणी तसेच नऱ्हे येथील भूमकर पुलाखाली एका व्यक्तीला कोयत्याचा धाक दाखवून लुटले.
त्याचबरोबर १५ फेब्रुवारी रोजी एका बांधकाम व्यावसायिकाच्या ऑफिसमध्ये जाऊन लोखंडी कोयते,चाकू,हॉकी स्टिक अशी हत्यारे बरोबर घेऊन त्याचा धाक दाखवून खंडणी मागत १० हजार रुपये घेतले. यामध्ये सामील असणाऱ्या आरोपींचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अभ्यास करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे सिंहगड रस्ता पोलिसांनी सांगितले.
पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर आत्तापर्यंत २१ टोळ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.संघटित गुन्हेगारीचे जाळे उखडून टाकण्यासाठी राज्य सरकारने तयार केलेला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) पुणे पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाईचा धडाकाच सुरु केला आहे. अनेक टोळ्यांवर प्रभावीपणे ‘मोक्का’ लावल्यामुळे पुण्यातील संघटित गुन्हेगारीचे कंबरडे मोडले आहे.
......
दोनवेळा तडीपार अन गुन्ह्यांची मालिका..
गुंड रोशन लोखंडे व त्याच्या साथीदारावर २०१६ सालापासून पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. रोशन लोखंडे व त्याच्या टोळीविरुद्ध शस्त्र जवळ बाळगणे, बेकायदा शस्त्र बाळगणे,अग्निशस्त्र बाळगणे, जबरी चोरी करणे आदी प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. याआधी रोशन लोखंडे याला दोनवेळा तडीपार करण्यात आले होते.सुरूच, मात्र तरीही गुन्ह्यांची मालिका सुरूच होती.
........
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार तसेच संघटित टोळी तयार करून त्याचबरोबर गुन्हेगारी कृत्य करून दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्द कडक कारवाई करण्यात येत आहे.
- देविदास घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक , सिंहगड रस्ता पोलीस ठाणे