ताडीसाठी बनावट रसायन विकणाऱ्यावर प्रथमच मोक्का कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:15 AM2021-09-07T04:15:48+5:302021-09-07T04:15:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ताडी बनविण्यासाठी बनावट रसायनाची विक्री करणाऱ्या सराईतांवर संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ताडी बनविण्यासाठी बनावट रसायनाची विक्री करणाऱ्या सराईतांवर संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. ताडी विक्रेत्यांवर प्रथमच मोक्का कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली ही मोक्काची ५१ वी कारवाई आहे.
टोळी प्रमुख प्रल्हाद ऊर्फ परेश रंगनाथ भंडारी (रा. पीडीसी बँकेसमोर, केशवनगर, मुंढवा), सुनील गंगाराम बनसोडे (वय २०, रा. सोरतापवाडी, ता. हवेली), शहारूख युसुफ मन्सुरी (वय २५, रा. इंदिरानगर, लोणी-काळभोर) आणि त्यांचा फरारी साथीदार नीलेश विलास बांगर यांच्यावर मोक्काअंतर्गत करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी आरोपींच्या मोक्काचा प्रस्ताव सादर केला होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त नामेदव चव्हाण, गुन्हे उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्काची कारवाई करण्यात आली.
लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास अदित्य कुशन वर्कसच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये सुनील बनसोडे याच्या ताब्यातून २६५ लिटर रासायनिक विषारी ताडी व ताडी बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले होते. अवैध ताडी विक्रीचा व्यवसाय शाहरुख मन्सुरी याचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्याला हे रसायन टोळी प्रमुख प्रल्हाद भंडारी आणि नीलेश बांगर यांनी घाऊक भावात पुरविले होते. म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रासायनिक ताडी बनविण्याचे विषारी साहित्य मानवी शरीरावर घातक परिणाम करणारे पदार्थ क्लोरलहाईड्रेड, सॅक्रीन, मड्डी पावडर, यिस्ट इत्यादी साहित्य हे नीलेश बांगर याच्याकडून घाऊक भावात खरेदी करत होते. नंतर भंडारी हा पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी बेकायदेशीररित्या अवैध ताडी विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. भंडारीवर यासारखेच १० गुन्हे दाखल आहेत. बांगर याच्यावर शहर आणि जिल्ह्यात सात गुन्हे दाखल आहेत. ताडी बनविण्यासाठी लागणाऱ्या रसायनाची साठवणूक करून विक्री करणे अशा प्रकारे आरोपी संघटित गुन्हेगारी करत होते. तपासामध्ये त्याच्यावर लोणी काळभोर, हडपसर पोलिस ठाणे, राज्य उत्पादन शुल्क येथे १० गुन्हे दाखल आहेत. त्याच अनुषंगाने अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. शहरात ताडी विक्रेत्यांवर करण्यात आलेली मोक्काची ही पहिलीच कारवाई आहे.